Litoral Penitentiary Gang War: इक्वाडोरमध्ये तुरुंगात ड्रग्स माफियांमध्ये भीषण गँगवॉर, सुमारे ६८ कैद्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 13:13 IST2021-11-14T13:12:02+5:302021-11-14T13:13:40+5:30
Litoral Penitentiary Gang War: इक्वाडोरमधील सर्वात मोठा तुरुंग असलेल्या लिटोरल पेनिटेंशरीमध्ये शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये गँगवॉर उफाळले. यावेळी झालेल्या तुफान गोळीबारामध्ये ६८ कैदी मारले गेले. तर २५ जण जखमी झाले आहेत.

Litoral Penitentiary Gang War: इक्वाडोरमध्ये तुरुंगात ड्रग्स माफियांमध्ये भीषण गँगवॉर, सुमारे ६८ कैद्यांचा मृत्यू
क्विटो (इक्वाडोर) - इक्वाडोरमधील सर्वात मोठा तुरुंग असलेल्या लिटोरल पेनिटेंशरीमध्ये शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये गँगवॉर उफाळले. यावेळी झालेल्या तुफान गोळीबारामध्ये ६८ कैदी मारले गेले. तर २५ जण जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर बराचवेळ तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती अशी माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली.
या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरुंगामध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स कार्टेलशी संबंधित गटांमध्ये लढाईची ही घटना घडली आहे. ही घटना किनारपट्टीवरील शहर गुआयाकिलमधील तुरुंगामध्ये सकाळ होण्यापूर्वी घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही मृतदेह जळालेले तर काही तुरुंगातील जमिनीवर पडलेल्या अवस्थेमध्ये होते.
गुआस प्रांतातील गव्हर्नर पाब्लो अरोसेमेना यांनी सांगितले की, सुरुवातीची चकमक ही सुमारे आठ तास चालली. यादरम्यान कैद्यांनी पॅव्हेलियन दोनमध्ये जाण्यासाठी भिंत डायनामाईटने उडवण्याचा प्रयत्न केला, तसेच जाळपोळ केली. अरोसेमेना यांनी सांगितले की, आम्ही अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात लढत आहोत. मात्र ही लढाईल खूप कठीण आहे.
राष्ट्रपतींचे प्रवक्ते कार्लोस जिजोन यांनी सांगितले की, आम्हाला लिटोरल पेनिटेंशरीमध्ये नव्याने चकमक झाल्याची माहिती मिळाली आहे. हॉल १२ च्या कैद्यांनी हॉल ७ मधील कैद्यांवर हल्ला केला. सुमारे ७०० पोलीस अधिकारी तुरुंगाच्या आत एका पथकासह परिस्थितीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.
राष्ट्रपती गुइलेर्मो लासो यांनी ऑक्टोबरमध्ये घोषित राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान तुरुंगात हा हिंसाचार झाला आहे. राष्ट्रीय आणीबाणी सुरक्षा दलांना मादक पदार्थांची तस्करी आणि अन्य गुन्ह्यांविरोधात लढण्याचा अधिकार देत आहे.