हाय गर्मी! 'या' देशाला उन्हाचा तडाखा, लावला लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, ऑफिस बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:54 IST2023-08-02T16:53:55+5:302023-08-02T16:54:55+5:30
देशातील उष्णतेबाबत सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे की, कडक उन्हामुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

हाय गर्मी! 'या' देशाला उन्हाचा तडाखा, लावला लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, ऑफिस बंद
भारतात सध्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मात्र इराणमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचं जगणं कठीण झालं आहे. वाढत्या तापमानामुळे इराणमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उष्णतेमुळे दोन दिवसांपासून संपूर्ण देश ठप्प झाला आहे. 2 ते 3 ऑगस्टरोजी इराणमध्ये सर्व काही बंद आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे 'उष्णता'. इराण सरकारने दोन दिवस शाळा, बँका आणि सरकारी कार्यालये बंद ठेवली आहेत.
देशातील उष्णतेबाबत सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे की, कडक उन्हामुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. विजेचा तुटवडा असून मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. इराणमधील अनेक शहरांमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे लोक अनेक अडचणींचा सामना करत आहेत.
उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका इराणच्या दक्षिणेकडील शहरांना बसला आहे. या शहरांतील तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. 1 ऑगस्ट रोजी या शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत मोजले गेले. देशातील वाढत्या तापमानाबाबत इराण सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, "येत्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने दोन दिवसांच्या देशव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे."
इराणची राजधानी तेहरानसह देशातील 13 ते 15 शहरांमध्ये 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान मोजले गेले. इराणचा मोठा भाग डोंगराळ आणि सखल प्रदेशांनी वेढलेला आहे. त्यामुळे या भागात फारशी उष्णता नसली तरी अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढत यावेळी येथेही प्रचंड उकाडा जाणवत आहे. इराणमध्ये पावसाळा नोव्हेंबर ते मे पर्यंत असतो, तर उन्हाळा मे ते ऑक्टोब पर्यंत असतो. मात्र यावेळी समीकरण बिघडताना दिसत आहे. अहवालानुसार, इराणमध्ये उन्हाळ्यात तापमान सामान्यतः 26 ते 32 अंश सेल्सिअस असते तर कमाल तापमान 35 अंशांपर्यंत असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.