पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:07 IST2025-12-18T17:06:56+5:302025-12-18T17:07:28+5:30
Lalit Modi & Vijay Mallya News: हजारो कोटींचं कर्ज थकवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या आणि काही गंभीर आरोपांनंतर भारताबाहेर गेलेला आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी हे दोघे पळपुटे भारतीय सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत.

पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
हजारो कोटींचं कर्ज थकवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या आणि काही गंभीर आरोपांनंतर भारताबाहेर गेलेला आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी हे दोघे पळपुटे भारतीय सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. तिथे विजय माल्या याच्या काही दिवसांनी असलेल्या वाढदिवसानिमित्त ललित मोदी याने एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. तसेच या पार्टीमध्ये विजय माल्या आणि ललित मोदी एकत्र आलेले दिसले. एवढंच नाही तर या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.
विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने ही पार्टी बेलग्रेव स्क्वेअर येथील आपल्या आलिशान निवासस्थानी आयोजित केली होती. या पार्टीला बायोकॉनचे संस्थापक किरण मजुमदार-शॉ, अभिनेता इदरीस एल्बा आणि फॅशन डिझायनर मनोविराज खोसला हे उपस्थित होते. प्रसिद्ध फोटोग्राफर जिम रायडेल याने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच विजय माल्यासाठी एक जंगी पार्टी आयोजित केल्याबद्दल ललित मोदींचे आभार मानले.
ललित मोदीनेही या पार्टीचे फोटो शेअर करत या पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्याचे आभार मानले. तसेच विजय माल्याचा उल्लेख आपला मित्र असा करत त्याचं खूप कौतुक केलं. या पार्टीचं निमंत्रण पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यात विजय माल्या याला ‘किंग ऑफ गुड टाइम्स असे म्हटले आहे.
मात्र या जंगी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून ललित मोदी आणि विजय माल्या यांना नेटिझन्सकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच लंडनमध्ये मौजमस्ती करत असलेल्या या दोघाही पळपुट्यांना सोशल मीडियावर झोडून काढण्यात येत आहे. हे दोघेही भारतीय अधिकाऱ्यांपासून वाचून एवढी मौजमजा कशी काय करत आहेत, असा सवाल काही नेटिझन्सनी उपस्थित केला आहे. तर या निमित्ताने काही जणांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.