रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 18:06 IST2025-05-01T18:06:03+5:302025-05-01T18:06:30+5:30
Kosmos 482 Venus Lander: सुमारे ५३ वर्षांपूर्वी १९७२ साली तेव्हाच्या सोव्हिएत रशियाने सोडलेला एक उपग्रह अनियंत्रित होऊन पृथ्वीवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोस्मोस ४८२ नावाचा हा उपग्रह शुक्र ग्रहावर उतरण्यासाठी पाठवण्यात आला होता. पुढच्या आठवड्यात तो पृथ्वीवर कोसळू शकतो.

रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली
सुमारे ५३ वर्षांपूर्वी १९७२ साली तेव्हाच्या सोव्हिएत रशियाने सोडलेला एक उपग्रह अनियंत्रित होऊन पृथ्वीवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोस्मोस ४८२ नावाचा हा उपग्रह शुक्र ग्रहावर उतरण्यासाठी पाठवण्यात आला होता. पुढच्या आठवड्यात तो पृथ्वीवर कोसळू शकतो. शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हा उपग्रह १० मे २०२५ च्या आसपास पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. मात्र तो नेमका पृथ्वीवर कुठे आदळेल, याबाबच अचूक अंदाज वर्तवता आलेला नाही.
कोस्मोस ४८२ हा उपग्रह १९७२ मध्ये सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला होता. हा उपग्रह वेनरा या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत तयार करण्यात आलं होतं. या मोहिमेचा उद्देश शुक्र ग्रहाच्या पृष्टभागावरून डेटा गोळा करणं हा होता. हा उपग्रह वेनरा ८ चं सहकारी यान होतं. वेनरा ८ या यानाने जुलै १९७२ मध्ये शुक्र ग्रहाच्या पृष्टभागावर उतरून ५० मिनिटांपर्यंतचा डेटा पाठवला होता. मात्र कोस्मोस ४८२ आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. तसेच त्याला अंतराळात घेऊन जाणाऱ्या सोयुझ रॉकेटच्या वरच्या भागात काही प्रमाणात बिघाड झाला. त्यामुळे या उपग्रहाला शुक्र ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठीची आवश्यक गती मिळू शकली नाही. तो पृथ्वीच्या एका अंडाकार कक्षेत अडकून फिरत राहिला.
प्रक्षेपण केल्यानंतर कोस्मोस ४८२ दोन भागात विभागलं गेलं. त्यातील मुख्य भाग १९८१ मध्ये पृथ्वीच्या वातावरणात येऊन नष्ट झालं. तर लँडरचा भाग मागच्या ५० वर्षांपासून पृथ्वीच्या कक्षेत घिरट्या घातल आहे. आता नेदरलँडमधील डेल्फ टेक्निकल युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक मार्को लेंगब्रोक यांनी टेलिस्कोपवरून विश्लेषण करून हा लँडर लवकरत पृथ्वीवर येईल, असा दावा केला.
लेंगब्रोक यांनी केलेल्या दाव्यानुसार ४९५ किलो वजन आणि एक मीटर लांब असलेला हा लँडर १० मे २०२५ च्या आसपास पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. मात्र या अंदाजाबाबत काही प्रमाणात अनिश्चितताही आहे. लेंगब्रेक यांनी सांगितले की, कोस्मोस ४८२च्या कक्षेचा कोन ५२ डिग्री आहे. याचा अर्थ हा लँडर ५२ डिग्री उत्तर अक्षांक्ष ते ५२ डिग्री दक्षिण अक्षांशादरम्यान कुठेतरी कोसळू शकतो. यामध्ये युरोप, आशिया अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. मात्र बहुतकरून हा लँडर कुठल्यातरी महासागरात कोसळण्याची शक्यता अधिक आहे.