आयफोनसाठी 7 वर्षांपूर्वी किडनी विकलेली; आज अखेरच्या घटका मोजतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 13:39 IST2019-01-02T13:38:17+5:302019-01-02T13:39:23+5:30
आयफोनची क्रेझ एवढी आहे, की हा महागडा फोन घेण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकार बऱ्याचदा समोर आले आहेत

आयफोनसाठी 7 वर्षांपूर्वी किडनी विकलेली; आज अखेरच्या घटका मोजतोय...
शांघाय : आयफोनची क्रेझ एवढी आहे, की हा महागडा फोन घेण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकार बऱ्याचदा समोर आले आहेत. असाच 7 वर्षांपूर्वी चीनच्या एका युवकाने आयफोन-4 खरेदी करण्यासाठी आपली किडनी विकली होती. आज या युवक हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारावर आहे.
शाओ वेंग हा 2011 मध्ये 17 वर्षांचा होता. यावेळी आयफोन 4 ची किंमत 6999 डॉलर होती. हा महागडा फोन घेण्यासाठी त्याने त्याची एक किडनी काळ्या बाजारात 3487 डॉलरला म्हणजेच तेव्हाच्या 1.74 लाख रुपयांना विकली होती.
जेव्हा त्याच्या आईने आय़फोन कसा घेतला याबाबत विचारले होते, तेव्हा त्याने किडनी विकल्याचे सांगितले होते. या प्रकरणात तेव्हा 5 जणांना अटक करण्यात आली होती. या लोकांनी वेंगची किडनी 10 पटींनी अधिक किंमतीला विकली होती.
आता कालबाह्य झालेल्या या फोनसाठी किडनी विकल्याचा प्रताप या वेंगवर एवढा भारी पडला आहे की त्याचे आयुष्य आता डायलेसिसवर अवलंबून आहे. महत्वाचे म्हणजे, किडनी विकल्यानंतर वेंगवर चीनच्या एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र, अपयश आल्याने त्याच्या दुसऱ्या किडनीमध्ये संसर्ग झाला. यामुळे त्याची दुसरी किडनीही निकामी झाली आहे.
दुसरी किडनी निकामी झाल्याने वेंगला आता डायलिसिसवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या आई-वडिलांकडे आयफोन घेण्यासाठी तेव्हा पैसे नव्हते, मात्र त्याच्या उपचारासाठी त्यांना घरदार विकावे लागले आहे.