अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण; आई-वडिलांसह 8 महीन्यांच्या चिमुकलीचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:57 IST2022-10-04T18:56:44+5:302022-10-04T18:57:26+5:30
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीयांच्या अपहरणाची घटना घडली आहे.

अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण; आई-वडिलांसह 8 महीन्यांच्या चिमुकलीचा समावेश
वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून भारतीय वंशाच्या चार जणांच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. सोमवारी कॅलिफोर्नियाच्या मर्सिड काउंटीमधून एका आठ महिन्यांच्या मुलीसह भारतीय वंशाच्या चार जणांचे अपहरण करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मर्सिड काउंटी शेरीफ कार्यालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटले की, 36 वर्षीय जसदीप सिंग, 27 वर्षीय जसलीन कौर, त्यांची आठ महिन्यांची मुलगी आरोही आणि 39 वर्षीय अमनदीप सिंग यांचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांकडे अद्याप जास्त माहिती नाही, परंतु तपासात त्यांना असे आढळले की, या चौघांना त्यांच्या इच्छेविरुद्ध साउथ स्ट्रीट 59 च्या 800 ब्लॉकमधून नेण्यात आले.
पोलिस अधिका-यांनी सोमवारी सांगितले की, संशयिताचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असून, अनेकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, संशयित किंवा पीडित व्यक्तींशी संपर्क करू नका आणि दिसल्यास ताबडतोब 911 वर कॉल करा, अशा सूचना अधिका-यांनी दिल्या आहेत.