पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना आणि युद्धाची शक्यता दिसत असतानाच खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने एक मोठी घोषणा केली आहे. जर भारतानेपाकिस्तानवर हल्ला केला, तर हे नरेंद्र मोदी आणि नवी दिल्लीसाठी शेवटचे युद्ध असेल, अशी धमकी पन्नूने दिली आहे. तो शीख फॉर जस्टिस (SFJ) नावाची बंदी असलेली संघटनाही चालवतो. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कुठल्याही प्रकारचे युद्ध म्हणजे, पंजाबसाठी भारतापासून विभक्त होण्याची एक संधी, असे पन्नूने म्हटले आहे.
पन्नूने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर पंजाब भारतापासून वेगळा करून खलिस्तान तयार केला जाईल. भारताने पंजाबवर कब्जा करून ठेवला आहे. अशा परिस्थितीत पंजाबमधील लोक भारतीय सैन्याविरुद्ध उभे राहतील. शीख समुदाय पाकिस्तानी सैन्याचे समर्थन करेल आणि यांच्यासाठी लंगरची व्यवस्था करेल.
पन्नूने पाकिस्तान सरकारला आवाहन केले आहे की, त्यांनी खलिस्तानचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत उपस्थित करावा आणि आणि पंजाबमध्ये जनमत चाचणी घ्यावी. पंजाबमध्ये भारतीय सैन्याविरोधात आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. लोक शीख सैनिकांना पाकिस्तानविरुद्ध लढण्यास विरोध करत आहेत. एवढेच नाही तर, हे युद्ध भारतासाठी अत्यंत महाग ठरेल. जर भारताने युद्ध केले तर त्याचे तुकडे होतील, असेही पन्नूने म्हटले आहे.
गुरपतवंत सिंग पन्नू गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरुद्ध विधाने करत आहे. त्याने कॅनडा आणि इतर काही देशांत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह पुतळे तयार करून रॅली देखील काढल्या आहेत. भारतापासून पंजाब वेगळा करून खलिस्तान नावाचा नवा देश तयार करू, असेही तो वारंवार म्हणत असतो.