बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:23 IST2025-12-30T07:22:42+5:302025-12-30T07:23:56+5:30
Khaleda Zia Death: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे ढाका येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
ढाका: बांगलादेशच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बांगलादेशच्या राजकारणातील एका मोठ्या अध्यायाचा अंत झाला आहे.
मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास खालिदा झिया यांनी अखेरचा श्वास घेतला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (BNP) त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. २३ नोव्हेंबरपासून त्यांना फुफ्फुस आणि हृदयाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ डिसेंबरपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी बांगलादेशसह अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात होते. खालिदा झिया यांचे निधन अशा वेळी झाले आहे जेव्हा बांगलादेश एका मोठ्या राजकीय संकटातून जात आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र तारिक रहमान १७ वर्षांच्या वनवासानंतर नुकतेच मायदेशी परतले आहेत.
प्रदीर्घ आजारपण आणि संघर्ष
खालिदा झिया या लिव्हर सिरोसिस, संधिवात, मधुमेह आणि किडनीशी संबंधित गंभीर आजारांनी त्रस्त होत्या. शेख हसीना यांच्या कार्यकाळात त्यांना दीर्घकाळ नजरकैदेत राहावे लागले होते. अलीकडेच त्यांना उपचारासाठी परदेशात नेण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने ते शक्य झाले नाही.
राजकीय कारकीर्द आणि वारसा
१५ ऑगस्ट १९४५ रोजी जन्मलेल्या खालिदा झिया यांनी पती माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी तीन वेळा बांगलादेशचे पंतप्रधानपद भूषवले. त्या बांगलादेशच्या पहिल्या आणि मुस्लीम जगतातील दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या. मुलींचे शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.