Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:15 IST2025-07-30T14:14:51+5:302025-07-30T14:15:36+5:30

कामचटका द्वीपकल्पातील शक्तिशाली भूकंपाने केवळ रशियालाच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांना अलर्ट मोडवर टाकले आहे.

Kamchatka tsunami: A small corner of the world became an earthquake hotspot, shaking 12 countries in one go! Tsunami alert issued | Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी

Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी

रशियाच्या पूर्व कामचटका द्वीपकल्पात आज (३० जुलै) भूकंपाचा एक जोरदार धक्का बसला. यूएस जिओलॉजिकल सर्वेनुसार, या भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर स्केल इतकी प्रचंड होती आणि त्याची खोली १९.३ किलोमीटर नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, लोक घरातील महागड्या वस्तूंची पर्वा न करता जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. एका किंडरगार्टन शाळेचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तीव्र भूकंपाच्या धक्क्यानंतर संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

त्सुनामीचा धोका: अलर्टवर असलेले देश
या शक्तिशाली भूकंपाने केवळ रशियालाच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांना अलर्ट मोडवर टाकले आहे. रशिया, जपान, अमेरिका (हवाई आणि अलास्का), कॅनडा (ब्रिटिश कोलंबिया), न्यूझीलंड, चीन, इंडोनेशिया, तैवान, फिलिपिन्स, पेरू, मेक्सिको आणि इक्वाडोर यांसारख्या देशांमध्ये त्सुनामीची चेतावणी जारी करण्यात आली आहे.

जपानमधील होक्काइडो बेटावरील नेमुरो किनारपट्टीवर सुमारे ३० सेंटीमीटर उंचीच्या लाटा आदळल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर रशियाच्या कुरील द्वीपसमूहातही पहिली त्सुनामी लाट पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. जपानने तातडीने २० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, आपल्या फुकुशिमा अणुभट्टी परिसरातील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. 

कामचटका: भूकंपांचं घर
कामचटका हा रशियाच्या सुदूर पूर्वेकडील एक विशाल, जंगली, डोंगराळ आणि ज्वालामुखीय प्रदेश असलेला द्वीपकल्प आहे. हा सुमारे १२०० किलोमीटर लांब आणि ४८० किलोमीटर रुंद आहे. येथील हवामान उप-आर्क्टिक प्रकारातील असून, हिवाळा दीर्घ आणि बर्फाळ असतो, तर उन्हाळा खूपच लहान आणि थंड असतो. येथे दोन प्रमुख पर्वतरांगा आणि अनेक नद्या असून, कामचटका नदी सर्वात महत्त्वाची आहे. तुंद्रा प्रदेशापासून ते घनदाट जंगलांपर्यंत विविध प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात.

कामचटका द्वीपकल्प भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. हा प्रदेश पॅसिफिक प्लेट आणि नॉर्थ अमेरिकन प्लेटच्या सबडक्शन झोनवर (जिथे एक प्लेट दुसऱ्या प्लेटखाली सरकते) स्थित आहे. यामुळे येथे सातत्याने भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकासारख्या घटना घडतात. कामचटका हा ‘रिंग ऑफ फायर’चा भाग आहे, जो प्रशांत महासागराभोवती पसरलेला आहे आणि जिथे जगातील ७५% पेक्षा जास्त ज्वालामुखी आणि ९०% भूकंप होतात. त्यामुळे कामचटकाला भूकंपाचे घर असे म्हटले जाते.

इतिहास आहे साक्षी!
कामचटकामध्ये यापूर्वीही मोठे भूकंप झाले आहेत. ४ नोव्हेंबर १९५२ रोजी येथे ९.० तीव्रतेचा भूकंप आला होता, ज्यामुळे हवाईमध्ये सुमारे ३० फूट उंचीच्या त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. सुदैवाने, त्यावेळी कोणतीही मोठी जीवितहानी झाली नव्हती. याच जुलै २०२५ महिन्यात या परिसरात पाच मोठे धक्के नोंदवले गेले आहेत, ज्यात एका धक्क्याची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल होती.

सध्या सरकारी यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लोकांना किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अजूनपर्यंत कोणत्याही मोठ्या त्सुनामीची किंवा जीवितहानीची पुष्टी झाली नसली तरी, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. या घटनेमुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Kamchatka tsunami: A small corner of the world became an earthquake hotspot, shaking 12 countries in one go! Tsunami alert issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.