अवघ्या १२० सेकंदांचा थरार! इराणचे महाविनाशक बॉम्बर्स कतारने पाडले; अमेरिकन एअरबेसवर मोठा हल्ला टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:12 IST2026-03-05T11:11:08+5:302026-03-05T11:12:00+5:30
कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन एअरबेसवर हल्ला करण्यासाठी निघालेली इराणची दोन 'Su-24' टॅक्टिकल बॉम्बर्स विमाने कतारच्या हवाई दलाने चित्तथरारक पाठलाग करून पाडली आहेत.

अवघ्या १२० सेकंदांचा थरार! इराणचे महाविनाशक बॉम्बर्स कतारने पाडले; अमेरिकन एअरबेसवर मोठा हल्ला टळला
मध्यपूर्वेतील युद्ध आता क्षेपणास्त्रांच्या पलीकडे जाऊन भीषण हवाई युद्धाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन एअरबेसवर हल्ला करण्यासाठी निघालेली इराणची दोन 'Su-24' टॅक्टिकल बॉम्बर्स विमाने कतारच्या हवाई दलाने चित्तथरारक पाठलाग करून पाडली आहेत. जर ही विमाने आणखी दोन मिनिटे हवेत राहिली असती, तर १० हजार अमेरिकन सैनिकांचा जीव गेला असता आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गॅस फॅसिलिटीचे प्रचंड नुकसान झाले असते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
काय घडला मध्यरात्रीचा थरार?
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने सोव्हिएत बनावटीची दोन शक्तीशाली Su-24 विमाने कतारच्या दिशेने रवाना केली होती. त्यांचे लक्ष्य होते अमेरिकेचा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा 'अल-उदीद एअरबेस'. रडारच्या नजरेतून वाचण्यासाठी ही विमाने समुद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या ८० फूट उंचीवरून उडत होती. कतारच्या रडारवर संशयास्पद हालचाल दिसताच 'रेडिओ'वरून इशारा देण्यात आला, पण इराणच्या वैमानिकांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
कतारच्या 'एफ १५'ची झेप आणि डॉगफाईट
वेळ अत्यंत कमी होता. इराणची विमाने आपल्या लक्ष्यापासून केवळ २ मिनिटांच्या अंतरावर असताना कतारने आपले 'एफ १५' फायटर जेट्स हवेत झेपावले. कतारच्या वैमानिकांनी या इराणी विमानांच्या तांत्रिक प्रतिमा घेतल्या, ज्यामध्ये ती विमाने जड बॉम्ब आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कतरी वैमानिकांनी हवेतच इराणच्या विमानांशी झुंज दिली आणि अचूक मारा करून दोन्ही बॉम्बर्स कतारच्या समुद्रात पाडले.
कतारची इराणला कडक तंबी
या घटनेनंतर कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. "इराणची ही कृती म्हणजे थेट युद्ध भडकवण्याचा प्रयत्न आहे," अशा शब्दांत त्यांनी इराणला फटकारले आहे. कतारचे प्रवक्ते माजिद अल-अंसारी यांनी सांगितले की, कोसळलेल्या विमानांच्या क्रू मेंबर्सचा शोध घेण्यासाठी समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
इराणच्या युद्धनीतीत मोठा बदल
आतापर्यंत इराण केवळ बॅलिस्टिक मिसाइल आणि ड्रोनचा वापर करत होता. मात्र, थेट फायटर जेट्स आणि बॉम्बर्स पाठवणे हा इराणच्या युद्धनीतीमधील एक दुर्मिळ आणि धोकादायक बदल मानला जात आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून इराणने आतापर्यंत ४०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि १,००० हून अधिक ड्रोन अरब देशांच्या दिशेने डागले आहेत. गेल्या रविवारी कुवेतमध्ये झालेल्या अशाच एका हल्ल्यात ६ अमेरिकन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता.