पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 23:39 IST2025-04-26T23:38:19+5:302025-04-26T23:39:01+5:30
पाकिस्तानात पाण्यानंतर आता मेडिसीनचाही तुटवडा पडू शकतो, असे बोलले जात आहे...

पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानवर थेट कारवाई करत, सिंधू पाणी करार स्थगित करण्याबरोबरच इतरही अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. यातच, पाकिस्तानात पाण्यानंतर आता मेडिसीनचाही तुटवडा पडू शकतो, असे बोलले जात आहे.
जियो न्यूजने दिलेल्या वृत्यानुसार, पाकिस्तान औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या ३० ते ४० टक्के कच्च्या मालाच्या बाबतीत भारतावरच अवलंबून आहे. यात सक्रिय औषधी घटक (API) तसेच, अनेक आधुनिक उपचारात्मक उत्पादनांचा समावेश आहे. दरम्यान, औषध नियामक प्राधिकरणाने (DRAP) म्हटले आहे की, औषध क्षेत्रावर बंदीच्या परिणामांसंदर्भात कसल्याही प्रकारची औपचारिक सूचना देण्यात आलेली नाही. मात्र, आकस्मिक योजना आधीच तयार आहे.
चीन, रशिया आणि युरोपीय देशांमध्ये शोधतोय पर्याय -
यासंदर्भात बोलताना DRAP च्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आम्ही २०१९ च्या संकटानंतर, इमरजन्सीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली होती. आम्ही आता आमच्या औषधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करत आहोत. DRAP आता चीन, रशिया आणि युरोपीय देशांमध्ये पर्यायी स्रोत शोधत आहे.
संस्थेचे उद्दीष्ट, अँटी-रेबीज व्हॅक्सीन, अँटी-स्नेक वेनम, कँसर थेरेपी, मोनोक्लोनल अँटीबॉडी आणि इतर महत्वाच्या जैविक उत्पादनांसह आवश्यक वैद्यकीत पुरवठा सातत्याने सुरू रहावा, हे निश्चित करणे आहे. महत्वाचे म्हणजे, डीआरएपी तयारी केल्याचे आश्वास देत असले तरी, व्यापार निलंबनाच्या प्रतिकूल परिणामांना तोंड देण्यासाठी त्वरित कारवाई न केल्यास, एक मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, असा इशारा फार्मा उद्योगातील अंतर्गत सूत्र आणि आरोग्य तज्ज्ञांनी दिल्याचे समजते.