'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 02:50 IST2025-04-27T02:49:40+5:302025-04-27T02:50:19+5:30
दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आला आहे...

'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव चांगलाच शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार स्थगित केला. यामुळे, एकीकडे संपूर्ण पाकिस्तानचे लक्ष सिंधू पाणी कराराच्या मुद्द्याकडे लागले असतानाच. दुसरीकडे, झेलम नदीला अचानक पूर आल्याने मुजफ्फराबाद जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येथील प्रशासनाने वॉटर इमरजन्सीची घोषणा केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आला आहे.
संबंधित वृत्तांनुसार, स्थानिक प्रशासनाने हट्टियन बालामध्ये आणिबाणी लागू करून लोकांना सतर्क रहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मशिदींमधूनही घोषणा करून लोकांना सूचना दिली जात आहे. या वृत्तानंतर, नदी काठी राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. या वृत्तानुसार, हे पाणी भारतातील अनंतनाग आणि पाकिस्तानातील चकोठी भागातून वाहत आहे.
सिंधू करार रद्द -
तत्पूर्वी, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत अनेक निर्णय घेतले आहेत. यातच भारताने सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. यानंतर आता भारत सरकारकडून या पाण्याच्या वापरासंदर्भातही विचार केला जात आहे. सरकार भविष्यात पाण्याचा प्रवाह वळवण्यासह, इतरही संभ्याव्य पर्यायांवर कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टीने विचार करत आहे.
सिंधू नदीतील एक थेंब पाणीही पाकिस्तानात जाणार नाही -
दरम्यान, 'मोदी सरकारकडून सिंधू पाणी करारासंदर्भात घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय, हा पूर्णपणे न्यायसंगत आणि देशाच्या हिताचा आहे. पाकिस्तानात सिंधू नदीचे एक थेंब पाणीही जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,' असे जल शक्तीमंत्री सीआर पाटिल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टच्या माध्यमाने म्हटले आहे.