उद्दाम पर्यटकांमुळे जपानचा चेरी ब्लॉसम रद्द; इतक्या वर्षांची ही परंपरा पहिल्यांदाच मोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:10 IST2026-02-12T07:09:08+5:302026-02-12T07:10:42+5:30
जपानमधला माउंट फूजी संपूर्ण जगात त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. वसंत ऋतूत जेव्हा चेरी ब्लॉसम फुलतात, तेव्हा इथली रौनक पाहण्यासारखी असते.

उद्दाम पर्यटकांमुळे जपानचा चेरी ब्लॉसम रद्द; इतक्या वर्षांची ही परंपरा पहिल्यांदाच मोडली
कल्पना करा, पर्यटकांनी परवानगी न घेता तुमच्या घराचं दार उघडलं किंवा तुमच्या खासगी बागेत ते घुसले किंवा रहिवासी जागेत त्यांनी शौच केले तर? फुजियोशिदा या जपानमधल्या सुंदर शहरात अगदी असंच घडलंय. माउंट फूजीच्या पायथ्याशी वसलेलं हे शहर वसंत ऋतूतील चेरी ब्लॉसमसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी तेथे मोठा महोत्सव भरवला जातो. यावेळी मात्र हा महोत्सव अचानक बंद करून आयोजकांनी इतक्या वर्षांची आपली ही परंपरा पहिल्यांदाच तोडली आहे.
जपानमधला माउंट फूजी संपूर्ण जगात त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. वसंत ऋतूत जेव्हा चेरी ब्लॉसम फुलतात, तेव्हा इथली रौनक पाहण्यासारखी असते. माउंट फूजीच्या बर्फानं झाकलेल्या शिखरांचं आणि चेरी ब्लॉसमच्या सुंदर दृश्यांचं दर्शन घ्यायला संपूर्ण जग आतुर असतं. मात्र पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक जाममुळे हैराण होऊन जपानमधल्या फुजियोशिदा शहरानं यंदा एक कठोर निर्णय घेतलाय, तो म्हणजे येथील जगप्रसिद्ध चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलच रद्द करण्याचा. त्यामुळे संपूर्ण जगच आश्चर्यचकित झालंय. पण त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुकही केलंय.
अधिकाऱ्यांना नाइलाजानं हा निर्णय घ्यावा लागला, कारण पर्यटकांची वाढती संख्या शहराच्या व्यवस्थेवर मोठं ओझं ठरत होती. भीषण ट्रॅफिक जाममुळे लोक त्रस्त होते आणि अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचत होते. पण समस्या एवढ्यावरच थांबत नव्हती. पर्यटकांचं गैरवर्तन स्थानिक लोकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. शहरातल्या रहिवाशांनी पर्यटकांच्या वर्तनाबाबत अतिशय धक्कादायक खुलासे आणि तक्रारी केल्या आहेत. अहवालानुसार काही पर्यटक स्थानिकांच्या घरांची दारं उघडून परवानगी न घेता बाथरूम वापरायचे. काही जण त्यांच्या खासगी बागांमध्ये शिरायचे, तर काही लोक थेट रहिवासी जागांवरच शौच करताना आढळले. यासंदर्भात महापौर शिगेरू होरीउची म्हणतात, हा निर्णय नागरिकांच्या कल्याणासाठी आणि शांततेच्या संरक्षणासाठी घेतला आहे. बेशिस्त पर्यटकांचं हे वाढतं संकट आमच्या समाजाच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण करीत आहे.
हा उत्सव २०१६ मध्ये ‘अराकुरायामा सेन्गेन पार्क’मध्ये सुरू झाला, जिथून पॅगोडा आणि माउंट फूजीचं दृश्य अत्यंत मनोहारी दिसतं. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उत्सव सुरू करण्यात आला. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे आणि जपानी चलन येन कमकुवत झाल्यानं इथली गर्दी प्रचंड वाढली. पर्यटन हंगामात इथे दररोज दहा हजारांपेक्षाही अधिक लोक येतात. एवढ्या पर्यटकांना सांभाळणं आता शहराच्या क्षमतेबाहेर गेलंय. चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल रद्द केला असला तरी एप्रिल आणि मे महिन्यांतही पर्यटक येत राहतील, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. हा निर्णय जपानमधल्या ‘ओव्हरटूरिझम’वर नियंत्रण मिळवण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा भाग आहे.
गेल्या वर्षी जपानमधील आणखी एका शहरानं पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी एका प्रसिद्ध स्पॉटवर मोठा काळा पडदा लावला होता. केवळ जपानच नाही, तर रोम आणि व्हेनिससारखी शहरंही आता गर्दी नियंत्रित करण्यासाठी एंट्री फीसारखी पावलं उचलताहेत. रोममध्ये ट्रेवी फाउंटनजवळ जाण्यासाठी २ युरो, तर व्हेनिसमध्ये दिवसा येणाऱ्या प्रवाशांकडून ५ ते १० युरो शुल्क आकारलं जात आहे.