जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:42 IST2025-12-04T15:42:10+5:302025-12-04T15:42:10+5:30
मसूद अजहरच्या म्हणण्यानुसार, या महिलांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या विंगची संपूर्ण जबाबदारी मसूद अजहरची बहीण सईदा सांभाळत आहे.

जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
मे महिन्यात भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मोठा फटका बसल्यानंतर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहर याने आता एका नव्या आणि अत्यंत धोकादायक कटाचा खुलासा केला आहे. अजहरने 'जमात-उल-मोमिनात' नावाच्या जैशच्या महिला विंगबद्दल मोठे दावे केले असून, यामध्ये आतापर्यंत ५,००० हून अधिक महिलांची भरती झाल्याचे त्याने म्हटले आहे.
मसूद अजहरच्या म्हणण्यानुसार, या महिलांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या विंगची संपूर्ण जबाबदारी मसूद अजहरची बहीण सईदा सांभाळत आहे.
ऑपरेशन सिंदूरचा फटका आणि नवी चाल
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जैश-ए-मोहम्मदला मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर संघटनेने आपली धोरणे बदलून महिलांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्याची ही नवी चाल खेळली आहे. ऑक्टोबर महिन्यात मसूद अजहरने या 'जमात-उल-मोमिनात' महिला ब्रिगेडची घोषणा केली होती. मसूद अजहरने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला आहे की, या महिला विंगचा प्रभाव वेगाने वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ५,००० हून अधिक महिला या समूहात सामील झाल्या आहेत.
ऑनलाइन 'जिहादी कोर्स' आणि विस्तार
जैशने महिलांची भरती आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक ऑनलाइन व्यासपीठ तयार केले आहे. यासाठी 'तुफात अल-मुमिनात' नावाचा एक ऑनलाइन जिहादी कोर्सही सुरू करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रत्येक महिलेकडून ५०० रुपये शुल्क आकारले जात आहे.
ऑनलाइन भरती का?
पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी गटांकडून महिलांना एकट्याने बाहेर जाणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे, 'आयएसआयएस', 'हमास' आणि 'लिट्टे'च्या धर्तीवर महिला आत्मघाती पथक तयार करण्यासाठी जैश आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. भरती आणि प्रशिक्षणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये या समूहाचा विस्तार केला जात आहे. मसूद अजहरनुसार, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'मुंतजिमा' नावाच्या एका महिला प्रमुखाच्या नेतृत्वाखाली एक कार्यालय तयार केले जाईल. ही मुंतजिमा या विंगच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवेल.