जैश-ए-मोहम्मद पुन्हा सक्रिय; गाझात मदतीच्या नावाखाली गोळा केले पैसे, ३१३ नवीन दहशतवादी तळ बांधण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:16 IST2025-08-21T13:13:51+5:302025-08-21T13:16:20+5:30
ई-वॉलेटद्वारे जैश-ए-मोहम्मद ३१३ नवीन दहशतवादी तळ बांधण्यासाठी अब्जावधी रुपये उभारत आहे

जैश-ए-मोहम्मद पुन्हा सक्रिय; गाझात मदतीच्या नावाखाली गोळा केले पैसे, ३१३ नवीन दहशतवादी तळ बांधण्याची तयारी
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या काही महिन्यांनंतर, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मद उद्ध्वस्त प्रशिक्षण शिबिरे आणि लपण्याच्या ठिकाणांचे नेटवर्क पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहे. जैश-ए-मोहम्मदने त्यांचा दहशतवाद्यांसाठी पायाभूत सुविधा पुन्हा सुरु करण्यासाठी निधी जमवण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे. मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले होते.
भारतात दहशतवाद पसरवण्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदने आता निधी उभारण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने जैशच्या ठिकाणांवर जोरदार हल्ला केला होता. त्यांचे मुख्यालयही उद्ध्वस्त करण्यात आले. आता पु्न्हा जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटना डोकं वर काढत असून फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सचे लक्ष टाळण्यासाठी नवीन युक्त्या अवलंबत आहे. या अंतर्गत जैशने आता ई-वॉलेटद्वारे देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून पेमेंट ट्रॅक केले जाऊ नये. हे पैसे मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यांमध्ये इझीपैसा आणि सदापे सारख्या पाकिस्तानमध्ये लोकप्रिय असलेल्या ई-वॉलेटद्वारे जमा केले जात आहेत.
एकाच वेळी एकाच खात्यात जास्त पैसे येऊ नयेत म्हणून ई-वॉलेटवर नवीन खाती तयार केली जात आहेत. याअंतर्गत पाकिस्तानमध्ये दहशतवादाची एक नवीन रचना तयार केली जात आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, दहशतवादी गट एका वेळी ७ ते ८ ई-वॉलेट चालू ठेवते. त्यानंतर, जुने अकाऊंट ४ महिन्यांत बंद केली जातात आणि त्यानंतर दरमहा ३० नवीन अकाऊंट उघडली जातात. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर यावेळी ३.९ अब्ज रुपये उभारण्याची तयारी करत आहे. इतकेच नाही तर तो या रकमेतून संपूर्ण पाकिस्तानात ३१३ दहशतवाद्यांची संबंधित केंद्रे बांधण्याची तयारी करत आहे.
पैसे गोळा करण्याच्या मोहिमेचे काम जैशचा प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तलहा अल सैफ करत आहेत. संस्थेने ऑनलाइन निधी गोळा करण्यासाठी इझीपैसा आणि सदापे सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची योजना आखली आहे. याशिवाय, जैशचे कमांडर मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी देणग्या गोळा करत आहेत. गाझामध्ये मानवतावादी मदतीच्या नावाखाली या देणग्या घेतल्या जात आहेत. तपासादरम्यान, जैश-ए-मोहम्मदशी संबधित देणगी पावतीची प्रत देखील सापडली. तपासात जमा करण्यात आलेले ३.९४ अब्ज पाकिस्तानी रुपये अनेक पाकिस्तानी डिजिटल वॉलेटमध्ये जात होते.