पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 07:57 IST2025-11-17T07:57:21+5:302025-11-17T07:57:53+5:30
जाफर एक्सप्रेस सातत्याने या वर्षभरात बंडखोरांच्या हल्ल्याचा सामना करत आहेत. या हल्ल्याची सुरुवात ११ मार्च रोजी झाली होती

पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
कराची - पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेस ट्रेनला टार्गेट केले आहे. बलूचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर लावलेल्या स्फोटकामुळे ट्रेन येण्यापूर्वीच मोठा स्फोट झाला. ज्यामुळे जाफर एक्सप्रेस आणखी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली.
पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेसवर याआधीही बऱ्याचदा हल्ले झाले आहेत. पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शहीद अब्दुल अजीज बुल्लो परिसरात रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब लावला होता. क्वेटाहून पेशावरसाठी जाणाऱ्या या ट्रेनच्या तिथून रवाना होण्यापूर्वी हा स्फोट घडला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या हल्ल्यात कुणीही प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी जखमी झाला नाही. स्फोटानंतर तातडीने या भागात सुरक्षा जवान पोहचले आणि त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. हा हल्ला कुणी केला आणि अज्ञात हल्लेखोर कुठे पसार झाले याचा तपास यंत्रणा शोध घेत आहे.
इतकेच नाही तर रेल्वे ट्रॅकवर स्फोटाशिवाय शस्त्रांनी सज्ज ४ रॉकेट ट्रेनवर डागण्यात आले. मात्र चारही रॉकेटपैकी एकही ट्रेनच्या कोचला धडकले नाही. स्फोटामुळे रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त झाला. ज्यामुळे क्वेटा आणि देशातील इतर भागात जाणारी रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी रोखण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ४ दिवसांच्या अंतराने ही सेवा रविवारी पुन्हा सुरू झाली होती. बलूच राष्ट्रवादी नेते मीर यार बलूच यांनी बलूच रिपब्लिकन गार्ड्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जाफर एक्सप्रेस सातत्याने या वर्षभरात बंडखोरांच्या हल्ल्याचा सामना करत आहेत. या हल्ल्याची सुरुवात ११ मार्च रोजी झाली होती. जेव्हा बलूचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी जवळपास ४४० प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून ही ट्रेन वारंवार टार्गेट होत आहे. जून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येही या ट्रेनला टार्गेट करून अनेकदा बॉम्बस्फोट आणि रॉकेट हल्ले घडवून आणले आहेत. ज्यात प्रवासी जखमी झालेत, ट्रेनचे डबे पटरीवरून घसरले आहेत.