गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 08:56 IST2025-12-20T08:56:38+5:302025-12-20T08:56:51+5:30
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक जगातली वेगवान चाकं नाकारून तो पायी चालत निघाला आहे.

गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
जग वेगाच्या चाकावर स्वार झालं आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अतिशय झटपट हवी आहे. अशा जगात एक व्यक्ती आहे जो आपल्या पायातल्या ताकदीवरचा विश्वास टिकवून आहे. कार्ल बशबी त्याचं नाव. आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक जगातली वेगवान चाकं नाकारून तो पायी चालत निघाला आहे. २७ वर्षांपूर्वी सुरू केलेला त्याचा पायी प्रवास आजही सुरूच आहे. हा प्रवास जेव्हा तो पूर्ण करेल तेव्हा त्याने पृथ्वीची पायी प्रदक्षिणा पूर्ण केलेली असेल!
इंग्लंडमधील यॉर्कशायर परगण्यातील हल हे एक बंदरशहर आहे. या शहरातील ५६ वर्षांचा कार्ल बशबी हा माजी ब्रिटिश पॅराटूपर आहे. विमानातून थेट पॅराशूटने शत्रूच्या प्रदेशात उतरून कारवाई करण्याचं साहस त्याने अनेकदा दाखवलं. सैन्यात असताना वेगवेगळ्या मोहिमांच्या निमित्ताने त्याचं प्रवासावर प्रेम जडलं. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं आणि अनुभव घेण्याचं वेडच त्याला लागलं. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात ध्येय आणि साहस असायला हवं असं वाटत असतानाच त्याने पृथ्वीला पायी प्रदक्षिणा घालण्याची मोहीम आखली. या अचाट मोहिमेला त्याने गोलिएथ एक्स्पिडिशन' असं नाव दिलं.
ही साहसी मोहीम आखताना सुरुवातीला त्याने आठ वर्षाची कालमर्यादा ठरवली होती. पण आज २७वर्षानंतरही तो आपल्या लक्ष्याच्या दिशेने चालतोच आहे. अनेक खंडातून पायपीट करत, टोकाच्या भौगोलिक प्रदेशातून प्रवास करताना कार्लने असंख्य अडचणी, अडथळे आणि समस्यांचा सामना केला. उत्तर कोलंबिया आणि दक्षिण पनामा ओलांडल्यावर ९७ किलोमीटरच्या रेनफॉरेस्टने, अमेरिका आणि रशिया दरम्यानच्या बर्फाळ सामुद्रधुनीने कार्लची परीक्षा पाहिली. गोठवणाऱ्या थंडीत सामुद्रधुनी पार करण्यासाठी त्याला १४ दिवस चालावं लागलं. आता त्याचा कस लागणार आहे तो फ्रान्स आणि इंग्लंडला वेगळं करणाऱ्या 'चॅनेल बोगद्या'त. रेल्वेसाठीच्या बोगद्यातून त्याला चालता येणार नाही. टनेलची देखभाल दुरुस्तीचं काम करणाऱ्या टीमसाठी बनवलेल्या मार्गावर चालण्याचा पर्याय त्याच्यासमोर आहे पण त्यासाठी तेथील नोकरशाहीच्या परवानगी जाचातून त्याला जावं लागणार आहे. त्यासाठी किती वर्ष लागतील हे कार्ललाच माहिती नाही.
कार्लला इराण आणि रशियामध्ये सुरक्षितरित्या प्रवेश करणं अशक्य झालं, समुद्रामार्गे जाणं हाच त्याच्यासमोर पर्याय होता, तेव्हा त्याने कझाकस्तान ते अझरबैजान असा प्रवास कॅस्पियन समुद्रात पोहून केला. ३१ दिवस १३२ तास पोहून त्याने १७९ मैल अंतर पार केलं. अझरबैजान आणि तुर्कीमधून चालत तो इस्तंबूलच्या बॉस्फरस सामुद्रधुनीत पोहोचला.
१९९८ मध्ये कार्लने जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा त्याच्यासमोर ३६,००० मैलाचा रस्ता होता, पण पायीच प्रवास करायचा यावर तो ठाम होता. २००८ मध्ये मेक्सिकोमध्ये व्हिसा नाकारल्याने तो पाच वर्ष अडकून पडला. रशियाने त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घातली. त्याच्या मोहिमेच्या प्रायोजकांनी साथ सोडल्याने कार्ल मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला, पण त्याने प्रवास थांबवला नाही. आता कार्ल युरोप खंडात हंगेरी येथे आहे. तो त्याच्या लक्ष्यापासून ९३२ मैल दूर आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये तो हलला पोहोचेल. २७ वर्ष रोज नवीन आव्हानांना छातीवर घेणाऱ्या कार्लला घरी गेल्यावर काय करायचं हे मात्र सूचत नाहीये.