पुन्हा भारतात येणे सन्मानाची बाब : मेस्सी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:37 IST2025-10-03T12:36:50+5:302025-10-03T12:37:35+5:30
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने ‘जीओएटी (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) टूर इंडिया २०२५’ मध्ये सहभाग घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

पुन्हा भारतात येणे सन्मानाची बाब : मेस्सी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
कोलकाता : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटूलिओनेल मेस्सी याने ‘जीओएटी (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) टूर इंडिया २०२५’ मध्ये सहभाग घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे. भारतासारख्या ‘फुटबॉलवेड्या देशात’ पुन्हा येणे ही सन्मानाची बाब असल्याचे त्याने सांगितले.
मेस्सीने याआधी भारतात २०११ साली, म्हणजे तब्बल १४ वर्षांपूर्वी फुटबाॅल खेळला होता. त्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले, ‘हा प्रवास माझ्यासाठी मोठा सन्मानजनक आहे. भारत एक विशेष देश आहे आणि येथे १४ वर्षांपूर्वी व्यतित केलेला वेळ मला आजही आठवतो. तिथले चाहते अफलातून होते. भारत हा फुटबॉलसाठी वेड असलेला देश आहे. या सुंदर खेळाविषयीची माझी आवड नव्या पिढीच्या चाहत्यांसमोर मांडण्यासाठी मी उत्सुक आहे.’
पंतप्रधानांच्या भेटीसह दौऱ्याची सांगता
आयोजकांनी १५ ऑगस्ट रोजीच या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले होते आणि आता मेस्सीच्या घोषणेमुळे त्याला अंतिम स्वरूप मिळाले. मेस्सी आपली चार शहरांचा प्रवास १३ डिसेंबरला कोलकात्यातून सुरू करेल. त्यानंतर तो अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे जाणार आहे. दौऱ्याची सांगता १५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या भेटीतून होईल.
...तर ‘लिओ’ दोन वेळा येणार भारत दौऱ्यावर
अर्जेंटिनाचा राष्ट्रीय फुटबॉल संघही नोव्हेंबरमधील फीफा आंतरराष्ट्रीय विंडोदरम्यान केरळमध्ये एक मैत्री सामना खेळणार आहे. मात्र त्यातील प्रतिस्पर्धी आणि ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही. प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्या नेतृत्वाखालील हा विश्वविजेता संघ दि. १० ते १८ नोव्हेंबरदरम्यान भारतात खेळू शकतो. जर या सामन्यासाठी मेस्सीची निवड झाली, तर तो नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत दोनवेळा भारतात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तरीही काही सूत्रांनुसार अर्जेंटिना संघ मेस्सीशिवायही केरळमध्ये खेळू शकतो.