‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 09:42 IST2025-02-21T09:41:26+5:302025-02-21T09:42:25+5:30
गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. अनेक महिने अंतराळात काढल्यामुळे सुनीता विल्यम्स यांना साधी पेन्सिल उचलणेदेखील अवघड होणार आहे.

‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार
न्यूयॉर्क : जवळपास आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या ‘नासा’च्या भारतवंशीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असून, ते १२ मार्च रोजी पृथ्वीवर दाखल होतील. मात्र, पृथ्वीवर उतरल्यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार असून, गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. अनेक महिने अंतराळात काढल्यामुळे सुनीता विल्यम्स यांना साधी पेन्सिल उचलणेदेखील अवघड होणार आहे.
पृथ्वीवर उतरल्यानंतर दोन्ही अंतराळवीरांना त्यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या शारीरिक बदलांना सामोरे जावे लागेल. पृथ्वीवरचे गुरुत्वाकर्षण त्यांच्यासाठी एखाद्या धक्क्यासारखे असले. आमच्यासाठी गुरुत्वाकर्षण ही सर्वात मोठी समस्या असेल व साधी पेन्सील उचलणेदेखील एक प्रकारचे आव्हान ठरणार असल्याचे अंतराळवीर बुच यांनी स्पष्ट केले.
नेमके काय होते?
जास्त काळ अंतराळात राहिल्यास हाडांची घनता प्रत्येक महिन्याला एक टक्का कमी होतो. त्यामुळे पाय, पाठ व मानेच्या हाडांवर विपरित परिणाम होतो.
गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीरातील द्रव्य पदार्थ डोक्याकडे जातात. त्यामुळे डोळ्यांच्या मागील नसांवर विपरित परिणाम होतो.
त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते व नवीन चष्म्याची गरज पडू शकते.
सुनीता विल्यम्स म्हणाल्या...
परिस्थितीशी जुळवून घेणे आमच्यासाठी सर्वात अवघड काम असेल, असे सुनीता विल्यम्स म्हणाल्या. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अंतराळवीरांना पृथ्वीवर दाखल झाल्यानंतर पुनर्वसन कार्यक्रमातून जावे लागणार आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शरीरातील स्नायू अशक्त होतात.
तिथे प्रत्येक गोष्ट तरंगत असल्याने काम करण्यासाठी शरीराला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे पृथ्वीवर उतरल्यानंतर अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणासोबत जुळवून घेताना समस्यांचा सामना करावा लागतो. या करणांमुळे सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना काही दिवस चालण्या-फिरण्यासाठी तसेच संतुलन राखण्यासाठी अडचणी येऊ शकतात.