भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा असलेल्या ठिकाणाला नुकसान झाले, रेडिएशन बाहेर पडू लागले असे दावे केले जात असतानाच इस्रायल मोठ्या कारवाईची तयारी करत आहे. इराणच्या अण्वस्त्र ठिकाण्यांवर हल्ला करण्याची तयारी जोरात सुरु असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेने केला आहे.
सीएनएनच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी यावर काही ठोस निर्णय घेतला की नाही याबाबत अनिश्चितता आहे. परंतू, यावरून अमेरिकेतही मतभेद समोर येत आहेत. हा हल्ला होणार की नाही यावरून अमेरिकेतही दोन गट निर्माण झाले आहेत, असे यात म्हटले गेले आहे.
इस्रायलला अमेरिकेचा मोठा पाठिंबा आहे. त्यात इराण हा देश अण्वस्त्र निर्मिती करत असल्याने अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषद, वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावास आणि पंतप्रधान कार्यालयाने या गुप्तचर माहितीवर कोणतीही टिप्पणी केलेली नाही, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
इस्रायलकडून इराणच्या अणु संसाधनांवर हल्ला होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, असे गुप्तचर यंत्रणांशी संबंधीत सूत्राने म्हटले आहे. देशातील सर्व युरेनियम काढले जाणार नाही असा करार जर अमेरिकेने इराणसोबत केला तर हल्ल्याची शक्यता जास्त आहे, असे या सूत्राने सांगितले. ही गुप्त माहिती इस्रायलचे वरिष्ठ अधिकारी, त्यांची सार्वजनिक चर्चा, बैठका व अन्य हालचालींवर अवलंबून आहे. या गोष्टी संभाव्य हल्ल्याकडे इशारा करतात.
इस्रायलची तयारी काय...इस्रायलचे हवाई दल मोठ्या प्रमाणावर सराव करत आहे. तसेच मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे तैनात केली जात आहेत. अमेरिकेच्या काही युद्ध तज्ञांनुसार ही दबावाची रणनिती असू शकते. जर अमेरिकेसोबत इराणने यशस्वी डील केली नाही तर इस्रायल हल्ला करू शकते.