इस्रायल गाझावर कब्जा करण्याच्या पवित्र्यात; युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:27 IST2025-08-10T07:27:32+5:302025-08-10T07:27:56+5:30
नागरिक, ओलिसांच्या सुरक्षेची चिंता वाढली

इस्रायल गाझावर कब्जा करण्याच्या पवित्र्यात; युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता
जेरुसलेम : इस्रायलने गाझा शहरावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या २२ महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात आधीच हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या निर्णयामुळे गाझामधील नागरिक आणि ओलिसांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे.
दरम्यान, या युद्धामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून, बहुतांश लोक विस्थापित झाले आहेत. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली असून, मानवी संकट अधिक गडद झाले आहे. इस्रायलच्या या नव्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांनी, ज्यात फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी यांचा समावेश आहे, इस्रायलच्या या कारवाईवर टीका केली आहे.
सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होणार
इस्रायलच्या या निर्णयावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
हमासने इस्रायलच्या या योजनेला विरोध केला असून, गाझावर नियंत्रण मिळविणे सोपे नाही, असा इशारा दिला आहे.
हमासच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या या आक्रमकतेचा परिणाम भयानक होईल.
इजिप्त आणि कतार हे मध्यस्थ देश युद्ध संपविण्यासाठी आणि सर्व ओलिसांची सुटका करण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करत आहेत.