इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:48 IST2025-06-21T10:47:28+5:302025-06-21T10:48:24+5:30
Israel-Iran Conlfict: इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये इराणमधील अणुकेंद्रं आणि तेथील सत्तांतर हे इस्राइलचं मुख्य लक्ष्य असल्याचं दिसत आहे. तसेच ही अणुकेंद्रं नष्ट करण्यासाठी इस्राइल अमेरिकेकडे सातत्याने मदत मागत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील अणुकेंद्रांबाबत इस्राइलला धक्का देणारं विधान केलं आहे.

इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं...
इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेला घातक संघर्ष कमी होण्याची कुठलीही चिन्हे सध्या दिसत नाही आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले आणि प्रतिहल्ले होत असून, त्यात दोन्हीकडे जीवित आणि वित्तहानी होत आहे. या संपूर्ण संघर्षामध्ये इराणमधील अणुकेंद्रं आणि तेथील सत्तांतर हे इस्राइलचं मुख्य लक्ष्य असल्याचं दिसत आहे. तसेच ही अणुकेंद्रं नष्ट करण्यासाठी इस्राइल अमेरिकेकडे सातत्याने मदत मागत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील अणुकेंद्रांबाबत इस्राइलला धक्का देणारं विधान केलं आहे.
इराणविरुद्धच्या संघर्षात इस्राइलला मदत करण्यासाठी अमेरिकन सौन्य पाठवण्याच्या शक्यतेबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य पाठवणे हा आमच्यासाठी शेवटचा पर्याय असेल. सध्यातरी आमच्याकडे सुमारे दोन आठवड्यांचा वेळ आहे, असे सांगितले. ट्रम्प पुढे म्हणाले की, इस्राइलजवळ इराणमधील भूमिगत फोर्डो अणुकेंद्र स्वबळावर नष्ट करण्याची क्षमता आहे. मात्र ते फोर्डोच्या केवळ एका भागाला थोडंफार नुकसान पोहोचवू शकतात. मात्र त्याला नष्ट करू शकत नाहीत.
अमेरिकेच्या मते इराणकडे अणुबॉम्ब तयार करण्याची पूर्ण क्षमता आहे, असे वृत्त अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, आपल्या सर्वोच्च नेत्यांनी आदेश दिल्यास इराण काही आठवड्यांमध्येच अणुबॉम्ब तयार करू शकतो. इराणकडे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व साहित्य आहे. जर इराणने अणुबॉम्ब तयार केला तर ते संपूर्ण जगासाठी एक मोठं संकट असेल.
दरम्यान, ऑपरेशन रायझिंग लॉयन अंतर्गत इस्राइलने १२ जून रोजी इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करून जोरदार हल्ले केले होते. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरदाखल कारवाई करताना तेल अविवसह इस्राइलमधील सर्व प्रमुख शहरांवर तुफानी हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इस्राइलमध्येही मोठ्या प्रमाणवर वित्तहानी होत आहे.