इस्रायल-हमास युद्ध संपणार; अब्जावधींची राख, हजारोंचा बळी, हमासने स्वीकारलेल्या मसुद्यात असा आहे एक्झिट प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:17 IST2025-01-14T17:17:02+5:302025-01-14T17:17:16+5:30
हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे.

इस्रायल-हमास युद्ध संपणार; अब्जावधींची राख, हजारोंचा बळी, हमासने स्वीकारलेल्या मसुद्यात असा आहे एक्झिट प्लॅन
गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेले इस्रायल आणि हमासमधील युद्ध संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अब्जावधींची राख आणि हजारोंचा बळी घेऊन हे युद्ध समझोत्याच्या टप्प्यात आले आहे. हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे.
असोसिएटेड प्रेसने दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याचे वृत्त दिले आहे. कतार या दोन्ही बाजुंमध्ये मध्यस्थी करत आहे. गाझामध्ये युद्धबंदी करण्यास आणि अपहृतांच्या सुटकेसाठी एक समझोता केला जात आहे. दोहामध्ये दोन्ही बाजुचे लोक उपस्थित असून चर्चा निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. हमासने अद्याप यावर काही घोषणा केलेली नसून इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे.
यानुसार हमास पहिल्या टप्प्यात ३३ अपहृत नागरिकांची सुटका करणार आहे. यात मुले, महिला आणि सैनिक व ५० हून अधिक वयाचे पुरुष, जखमी आणि आजारी लोक असणार आहेत. हमासने अपहरण केलेले लोक जिवंत असतील अशी अपेक्षा इस्त्रायलला आहे.
पहिला टप्पा पूर्ण झाला की १६ दिवसांनी उरलेल्या अपहृत नागरिकांना सोडण्याची चर्चा केली जाणार आहे. यामध्ये पुरुष सैनिक आणि तरुणांना सोडले जाणार आहे. तसेच मृतांचा मृतदेहही दिला जाणार आहे. तसेच सैन्याची माघार टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे. फिलाडेल्फी कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी इस्रायली सैन्य तैनात केले जाईल. सैन्य मागे घेतले तरी सीमेजवळील शहरे आणि गावांचे संरक्षण करण्यासाठी इस्रायली सैनिक तैनात राहणार आहेत.
उत्तर गाझाच्या रहिवाशांना परतण्याची परवानगी दिली जाणार आहे. परंतू ते सोबत कोणतेही शस्त्र घेऊन जाऊ शकणार नाहीत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासच्या लोकांना सोडले जाणार नाही. परंतू खून किंवा प्राणघातक हल्ल्यांसाठी दोषी ठरलेल्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना सोडले जाणार आहे.
गाझाची मोठी लोकसंख्या गंभीर मानवीय संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे तिथे मानवतावादी मदत वाढवली जाणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. परंतू इस्त्रायलचा त्याला विरोध आहे. मानवतावादी मदत करण्यास परवानगी देण्यास तयार आहे, परंतु रकमेवर इस्त्रायल तयार नाहीय. गरजू लोकांना पैसे वाटले तर गुन्हेगारी टोळ्या ते लुटू शकतात अशी भीती इस्रायलला आहे. यावर मार्ग काढला जात आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.