'हमासला नष्ट करणार; युद्ध अनेक दिवस चालेल, तयार राहा', PM नेतन्याहूंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 14:19 IST2023-10-08T14:18:32+5:302023-10-08T14:19:52+5:30
दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला नष्ट करण्याची शपथ घेतली आहे.

'हमासला नष्ट करणार; युद्ध अनेक दिवस चालेल, तयार राहा', PM नेतन्याहूंचा इशारा
Israel-Hamas War:इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Israel-Hamas War) यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू आहे. शनिवारी (दि.7) हमासने इस्रायलवर हजारो मिसाईल डागले, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने युद्ध घोषित केले आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंट (हमास) ला प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे.
इस्रायलच्या पंतप्रधानांनी शनिवारी सांयकाळी देशातील जनतेला संबोधित करताना, या हल्ल्याचे इस्रायलच्या इतिहासातील एक गंभीर घटना म्हणून वर्णन केले. तसेच, इस्रायल 'बदला' घेणार आणि 'हमास दहशतवाद्यांचा' खात्मा करण्याची शपथ घेतली. हमासला नष्ट करण्यासाठी आम्ही सर्व शक्ती वापरू. हे युद्ध बराच काळ चालेल, देशातील नागरिकांनी यासाठी तयार राहावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
नेतन्याहू पुढे म्हणाले, हमासचे लोक जिथे-जिथे लपले आहेत, त्या सर्व ठिकाणांना आम्ही उडवून टाकू. यावेळी त्यांनी गाझातील लोकांना तात्काळ शहर सोडण्याचे आवाहन केले. दरम्यान, हमासने अचानक हल्ला करत शनिवारी पहाटेपासून सुमारे 3,000 रॉकेट इस्रायलवर डागले. हमासने काही इस्रायली नागरिक आणि सैनिकांनाही ओलीस ठेवल्याची माहिती मिळत आहे.
प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कराने गाझा पट्ट्यातील हमासच्या ठिकाणांवर दिवसभरात डझनभर हवाई हल्ले केले. या संघर्षामुळे दोन्ही बाजुचे मोठे नुकसान झाले आहे. गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे या भागात किमान 232 पॅलेस्टिनी ठार आणि 1,697 जखमी झाले. दरम्यान, इस्रायलमधील मृतांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे.