हमास प्रमुखांच्या ठिकणांवर इस्रायली सैन्याची कारवाई; 35 बोगदे आढळले, दारुगोळा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 18:37 IST2023-11-19T18:36:44+5:302023-11-19T18:37:18+5:30
इस्रायलचे सैन्य सातत्याने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहे.

हमास प्रमुखांच्या ठिकणांवर इस्रायली सैन्याची कारवाई; 35 बोगदे आढळले, दारुगोळा जप्त
Israel-Hamas War: गेल्या एका महिन्यापासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायली सैन्य सातत्याने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकणांना उद्ध्वस्त करत आहे. रविवारी इस्रायली सैन्याने हमास प्रमुखांच्या निवासस्थानांवर कारवाई केली. सैन्य निवासस्थानात गेले अन् आतील दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.
इस्रायली सैन्याला हमासच्या प्रमुखांच्या निवासस्थानी सुमारे 35 बोगदे सापडले. यासोबतच मोठ्या प्रमाणात दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. गाझा पट्टीच्या शेख एजलीन आणि रिमल भागात ही कारवाई करण्यात आली. इस्रायली सैन्याला इथे बोगदे आढळले, 7 रॉकेट लॉन्चर, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. या कारवाईदरम्यान इस्रायली सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल हमासच्या अनेक दहशतवाद्यांनाही ठार केले.
इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई आणि जमीन अशा दोन्ही बाजूंनी हल्ले होत आहेत. दुसरीकडे, हमासचे सैनिकही प्रत्युत्तर देत आहेत. रविवारी हमासने इस्रायली लष्कराचे रणगाडे उडवले. तिकडे रुग्ण, कर्मचारी आणि इतरांनी गाझा पट्टीतील सर्वात मोठ्या शिफा हॉस्पिटलचा परिसर रिकामा केला. रुग्णालय आता पूर्णपणे इस्रायली सुरक्षा दलांच्या ताब्यात आहे.
रुग्णालय हमासचा तळ होता
शिफा रुग्णालयाबाबत इस्रायल सुरुवातीपासूनच दावा करत आहे की, हमासचे सैनिक आरोग्य सुविधांच्या आडून आपली छावणी उभारत आहेत. शिफा हॉस्पिटलकडून अनेक व्हिडिओही जारी करण्यात आले होते, ज्यात हमासचे सैनिक शस्त्रास्त्रांसह दिसत होते. इस्रायलने दावा केला होता की हॉस्पिटलच्या आत एक बोगदा आहे जो हमास युद्धासाठी वापरत असलेल्या बोगद्याला जोडतो.