ओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट, ४९ दिवसांनंतर हमासच्या तावडीतून सुटल्यावर ओघळले आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:02 AM2023-11-26T06:02:34+5:302023-11-26T06:03:06+5:30

Israel-Hamas war: गाझामध्ये ४९ दिवस हमास अतिरेक्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेल्या इस्रायली महिला आणि मुलांची अत्यंत भावुक वातावरणात आपल्या परिवारासोबत पुनर्भेट झाली.  

Israel-Hamas war: Emotional reunion of hostage women, children, tears of joy after 49 days' release from Hamas | ओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट, ४९ दिवसांनंतर हमासच्या तावडीतून सुटल्यावर ओघळले आनंदाश्रू

ओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट, ४९ दिवसांनंतर हमासच्या तावडीतून सुटल्यावर ओघळले आनंदाश्रू

जेरुसलेम - गाझामध्ये ४९ दिवस हमास अतिरेक्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेल्या इस्रायली महिला आणि मुलांची अत्यंत भावुक वातावरणात आपल्या परिवारासोबत पुनर्भेट झाली.  कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर झालेल्या कराराअंतर्गत या इस्रायली नागरिकांना हमासने सोडले आहे.

श्निडर चिड्रन्स मेडिकल सेंटरच्या (एससीएमसी)  वतीने जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओत ओहद मुंदेर (वय ९) हा मुलगा धावत जाऊन आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारताना दिसून येतो. ओहद याची हमासने सुटका केली आहे. त्याच्यासोबत त्याची ५५ वर्षीय आई केरेन मुंदेर आणि ७८ वर्षीय आजी रुती मुंदेर यांनाही सोडण्यात आले आहे. रुतीचा पती अवराम मुंदेर मात्र अजून गाझामध्ये हमासच्याच ताब्यात असून त्याच्या सुटकेची प्रतीक्षा आहे.

सुटकेसाठी राबविली मोहीम
- हमासच्या ताब्यात असतानाच ओहद ९ वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस संपूर्ण इस्रायलमध्ये साजरा केला होता.
-रुबीक्स क्यूब जुळविण्यात तरबेज असलेल्या ओहदच्या सुटकेसाठी नागरिकांनी मोहीम चालविली होती.
- त्यासाठी पझल क्यूबच्या माध्यमातून ओहदची एक प्रतिमा बनविली होती. 

सर्वांच्या सुटकेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणार
ओहदचा भाऊ रॉय झिक्री मुंदेर याने व्हिडीओमध्ये म्हटले की, सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही ४९ दिवस टिकाव धरू शकलो. सर्व इस्रायली लोकांना धन्यवाद. मात्र, आपण आज आनंदोत्सव साजरा करणार नाही. कारण, अजूनही आपले काही लोक ओलीस आहेत. सर्वांच्या सुटकेपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याची गरज आहे.

इस्रायलला लष्करी साहाय्याचा विचार योग्य : बायडेन
- इस्रायलला सशर्त लष्करी साहाय्य करण्याचा विचार योग्य आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे. मात्र, या अटी काय असतील, याचा खुलासा त्यांनी केला.
- बायडेन यांनी मॅसॅच्युसेट्स येथे सांगितले की, इस्रायलला सशर्त लष्करी साहाय्य करण्याचा विचार योग्य आहे. आधीपासूनच असे केले असते, तर आपण आज जिथे आहोत, तिथे पोहोचलो नसतो. गाझामधील शस्त्रसंधी ४ दिवसांपेक्षा अधिक चालेल, अशी आशा आहे. 

Web Title: Israel-Hamas war: Emotional reunion of hostage women, children, tears of joy after 49 days' release from Hamas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.