इस्रायल गाझा ताब्यात घेणार; सुरक्षा परिषदेची नेतान्याहूंना मान्यता, आता काय होणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:50 IST2025-08-08T11:50:05+5:302025-08-08T11:50:48+5:30
Israel Gaza: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा ताब्यात घेण्याचे संकेत दिले आहेत.

इस्रायल गाझा ताब्यात घेणार; सुरक्षा परिषदेची नेतान्याहूंना मान्यता, आता काय होणार? जाणून घ्या...
Israel Gaza: मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले इस्रायल-गाझा युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की, इस्रायल गाझाचा ताबा घेणार नाही, त्याऐवजी संपूर्ण जबाबदारी अंतरिम राजवटीला सोपवेल. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या सुरक्षा परिषदेने नेतन्याहू यांच्या योजनेला मान्यता दिली आहे.
इस्रायल आणि गाझा यांच्यात बऱ्याच काळापासून तणाव सुरू आहे. गेल्या २२ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवारी (७ ऑगस्ट) फॉक्स न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नेतन्याहू यांना विचारण्यात आले की, इस्रायल संपूर्ण किनारी प्रदेश ताब्यात घेईल का? यावर त्यांनी सांगितले, आम्हाला गाझा आमच्याकडे ठेवायचा नाही. आमचा राज्य करण्याचा हेतू नाही. पण, हमासचा नाश करण्यासाठी गाझा पट्टी पूर्णपणे ताब्यात घेणे आवश्यक आहे.
नेतन्याहू गाझा पट्टी कोणाला सोपवणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा शहर ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. गाझा ताब्यात घेण्यापूर्वी सुरक्षा परिषदेला मंत्रिमंडळाचीही मान्यता घ्यावी लागेल. कोणत्याही प्रस्तावासाठी सुरक्षा परिषदेला संपूर्ण मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागते. कदाचित रविवार (१० ऑगस्ट) पर्यंत मान्यता मिळू शकते. इस्रायलकडून पॅलेस्टिनींना गाझा सोडून जाण्याचा इशारा दिला जात आहे.