गाझामध्ये अन्नाची मदत मिळण्याची वाट पाहणाऱ्यांवर इस्रायलचा हेलिकॉप्टमधून हल्ला, २० जण ठार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 02:54 PM2024-03-15T14:54:49+5:302024-03-15T14:55:14+5:30

Israel Hamas Gaza War Update: पॅलेस्टाइनचा दोन हल्ल्यांचा दावा, इस्रायलकडून मात्र हल्ल्याचा इन्कार

Israel denies Palestinian claim its forces killed 20 near Gaza aid distribution center | गाझामध्ये अन्नाची मदत मिळण्याची वाट पाहणाऱ्यांवर इस्रायलचा हेलिकॉप्टमधून हल्ला, २० जण ठार!

गाझामध्ये अन्नाची मदत मिळण्याची वाट पाहणाऱ्यांवर इस्रायलचा हेलिकॉप्टमधून हल्ला, २० जण ठार!

Israel Hamas Gaza War Update: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे सध्या गाझा पट्ट्यामध्ये सतत इस्रायलकडून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये ३१ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. तशातच नुकतेच इस्रायलने अन्नाच्या पॅकेट्सची मदत मिळणार या प्रतीक्षेत असलेल्या गाझाच्या नागरिकांवर हेलिकॉप्टरमधून गोळीबार केला, ज्यात सुमारे २० पॅलेस्टाइन लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात १५५ हून अधिक लोक जखमी झाले. हल्ल्याबाबत माहिती देताना गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले, "मृत्यू झालेल्यांचे २० मृतदेह आणि १५५ जखमींना अल-शिफा मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये नेण्यात आले. तर अनेक जखमींना कमल अडवान हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे."

मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यामुळे जखमींना रुग्णालयात आणणे कठीण झाले आहे. मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की मृत्यूची संख्या आणखी वाढू शकते कारण रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पुरेशी संसाधने नाहीत. लेबनीज माध्यमांशी बोलताना गाझा नागरी संरक्षणाचे प्रवक्ते महमूद बस्सल यांनी सांगितले की, इस्रायली रणगाड्यांनी गोळीबार सुरू करण्यापूर्वी, इस्रायली लष्करी हेलिकॉप्टरने मदतीची वाट पाहत असलेल्या लोकांवर गोळीबार केला.

दोन ठिकाणी हल्ले झाले

वृत्तानुसार, इस्रायलने दोन ठिकाणी हल्ले केले. पहिल्या घटनेत, इस्रायली सैन्याच्या हेलिकॉप्टरने मदत वितरण केंद्रात मदतीची व्यवस्था करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला, ज्यात सुमारे ८ लोक ठार झाले. दुसरी घटना उत्तर गाझा येथून उघडकीस आली जिथे इस्रायली टाक्यांनी मदतीच्या ट्रकची वाट पाहत असलेल्या लोकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये अनेक लोक मारले गेले.

इस्रायली सैन्याकडून हल्ल्याचा इन्कार

या हल्ल्याबाबत सीएनएनला दिलेल्या निवेदनात आयडीएफने या हल्ल्याला जबाबदार असल्याचा इन्कार केला आहे. निवेदनात म्हटले आहे की डझनभर गझा नागरिकांवर आणि मदत केंद्रांवर हल्ले झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. आम्ही प्रसारमाध्यमांना केवळ विश्वसनीय माहितीवरच विसंबून राहण्याचे आवाहन करतो.

Web Title: Israel denies Palestinian claim its forces killed 20 near Gaza aid distribution center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.