इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:04 IST2025-08-11T11:04:34+5:302025-08-11T11:04:51+5:30
गाझाच्या अल शिफा हॉस्पिटलच्या बाहेर पत्रकारांसाठी एक कॅम्प लावला गेला होता. त्यावर इस्रायलने मिसाईल डागले.

इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अल-जझीराचे पाच पत्रकार ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे इस्रायली लष्कराने लगेचच पत्रकार अनस अल-शरीफ याला हमास दहशतवादी म्हणून घोषित केले. यामुळेच त्यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्टीकरण आयडीएफने दिले आहे.
गाझाच्या अल शिफा हॉस्पिटलच्या बाहेर पत्रकारांसाठी एक कॅम्प लावला गेला होता. त्यावर इस्रायलने मिसाईल डागले. यामध्ये अल-जझीराचे अनस अल-शरीफ, मोहम्मद कारीकेह, कॅमेरामन इब्राहिम झहीर, मोआमिन अलिवा आणि मोहम्मद नौफल यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने अनस अल-शरीफ हा हमासचा दहशतवादी होता. तो हमासमधील दहशतवादी सेलचा प्रमुख म्हणून काम करत होता असा दावा केला आहे.
अल जझीराच्या प्रतिनिधीने X वर इस्रायलने गाझावर हल्ला केल्याची माहिती दिली होती. एवढेच नाही तर जर माझे हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले तर समजून घ्या की इस्रायल मला मारण्यात आणि माझा आवाज दाबण्यात यशस्वी झाला आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. इस्रायलवर मुद्दामहून पत्रकारांवर हल्ला केल्याचा आरोप तेथील संघटनांनी केला आहे. आतापर्यंत २०० माध्यम प्रतिनिधी मारले गेल्याचेही सांगितले जात आहे.
सहकाऱ्यांच्या मृत्यूची माहिती देताना अल-जझीराचे अँकर भावनिक झाले होते. अल-शरीफ गाझामध्ये चांगले काम करत होते. ते गाझामधील परिस्थितीबद्दल दररोज अहवाल देत असत, असे जझीराने म्हटले आहे.