इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:27 IST2025-12-28T09:20:17+5:302025-12-28T09:27:59+5:30
इस्त्रायलची मोठी खेळी! सोमालीलँडला दिली मान्यता; पण अमेरिकेसह अनेक देशांचा विरोध का? जाणून घ्या.

इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
जागतिक राजकारणात सध्या इस्त्रायलने घेतलेल्या एका निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोमालियापासून वेगळ्या होऊ पाहणाऱ्या 'सोमालीलँड'ला इस्त्रायलने अधिकृत राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. इस्त्रायलच्या या निर्णयामुळे आता जग दोन गटांत विभागले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, इस्त्रायलचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या अमेरिकेने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मान्यता देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सोमालीलँडने १९९१ मध्ये सोमालियापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. त्यांचे स्वतःचे चलन आणि स्वतःचे प्रशासन असले, तरी गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ जगातील कोणत्याही देशाने त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली नव्हती. इस्त्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे, ज्याने सोमालीलँडला सार्वभौम देशाचा दर्जा दिला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमालीलँडचे अध्यक्ष डॉ. अबदीरहमान मोहम्मद अबदुल्लाह यांचे अभिनंदन करत त्यांना इस्त्रायल भेटीचे निमंत्रणही दिले आहे.
अमेरिकेचा आणि आफ्रिकन युनियनचा कडाडून विरोध
इस्त्रायलने पाऊल उचलले असले, तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका सोमालीलँडला राष्ट्र म्हणून मान्यता देणार नाही. दुसरीकडे, आफ्रिकन युनियननेही इस्त्रायलच्या या कृतीचा निषेध केला आहे. सोमालियाची अखंडता तोडण्याचा कोणताही प्रयत्न खंडातील शांतता आणि स्थिरतेसाठी घातक ठरेल, असा इशारा आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष महमूद अली युसूफ यांनी दिला आहे.
इस्त्रायलने हे पाऊल का उचलले?
इस्त्रायलने अचानक ही घोषणा का केली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी अशी चर्चा होती की, गाझातील पॅलेस्टिनींना आश्रय देण्यासाठी इस्त्रायल सोमालीलँडशी संपर्क साधत आहे. मात्र, अमेरिकेने नंतर ती योजना बासनात गुंडाळली होती. आता इस्त्रायलला सोमालीलँडकडून नेमकी काय अपेक्षा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तुर्की आणि इजिप्त आक्रमक
सोमालियाचा मित्र देश असलेल्या तुर्कीने या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून, इस्त्रायल सोमालियाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला आहे. इजिप्तनेही सोमालीलँडला मान्यता देण्यास नकार दिला असून सोमालियाच्या प्रादेशिक अखंडतेचे समर्थन केले आहे.
जागतिक समीकरणे बदलणार?
इस्त्रायल आता सोमालीलँडला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी इतर देशांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे एकीकडे इस्त्रायल समर्थक देश आणि दुसरीकडे सोमालियाच्या अखंडतेचे समर्थन करणारे देश, असे दोन गट जागतिक राजकारणात पडताना दिसत आहेत. आफ्रिकेतील हा भाग सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने येणाऱ्या काळात येथील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.