'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 20:05 IST2025-10-22T20:03:58+5:302025-10-22T20:05:25+5:30
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली.

'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
Israel-America: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी स्पष्ट केलं की, इस्रायलला आपली सुरक्षा धोरणं ठरवण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यांनी ही भूमिका अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. वेंस यांच्याशी भेटण्यापूर्वी मांडली.
गाझामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल तैनात करण्याबाबत चर्चा सुरू असताना, नेतन्याहूंचं हे विधान आलं आहे. नेतन्याहूंनी आपल्या नागरिकांना आश्वस्त केलं की, अशा सुरक्षा दलामुळे इस्रायलच्या लष्करी कारवाईवर कोणताही आंतरराष्ट्रीय दबाव येणार नाही.
इस्रायल अमेरिकेचा गुलाम नाही - नेतन्याहू
वेंस यांच्याशी भेटीनंतर नेतन्याहू म्हणाले, “कधी लोक म्हणतात की, इस्रायल अमेरिका चालवतो, तर कधी म्हणतात अमेरिका इस्रायलला नियंत्रित करतो. या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. इस्रायल कोणाचाही गुलाम नाही. आम्ही अमेरिकेसोबत मजबूत भागीदारीत आहोत. आमची उद्दिष्ट बऱ्याच बाबतीत समान आहेत. कधी कधी मतभेद होऊ शकतात, पण आम्ही सहकार्यानं काम करतो.”
त्यांच्या या वक्तव्यानं हे स्पष्ट झालं की, इस्रायल स्वतंत्र सुरक्षा धोरणावर ठाम आहे आणि अमेरिकेच्या राजकीय दबावाला झुकण्यास तयार नाही.
गाझामधील शांती राखणे अवघड: वेंस
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. वेंस यांनी मान्य केलं की, गाझामध्ये शांती राखणं सोपं नाही. “हमासचं शस्त्रनिरस्तीकरण करणं आणि सामान्य पॅलेस्टिनियन नागरिकांना मदत करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे, पण आम्ही आशावादी आहोत,” असं वेंस म्हणाले. वेंस यांनी इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्झोग, तसेच अमेरिकी मध्यपूर्व दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांचीही भेट घेतली.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलाचे आराखडे
सध्या या दलात कोणते देश सहभागी होतील, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. वेंस यांच्या माहितीनुसार, तुर्की आणि इंडोनेशिया सैनिक पाठवू शकतात. तसेच ब्रिटन काही लष्करी अधिकारी पाठवून युद्धविरामाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे.