ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:17 IST2025-10-01T16:16:01+5:302025-10-01T16:17:57+5:30
Israel-America : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात फोन अन् नेतन्याहूंनी मागितली माफी; व्हाईट हाऊसने जारी केला ऐतिहासिक फोटो!

ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
Israel-America : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू व्हाईट हाऊस शेजारी शेजारी बसलेले, ट्रम्प प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि नेत्यांची उपस्थिती, ट्रम्प यांच्या मांडीवर लँडलाइन फोन अन् नेतन्याहूंच्या हातात रिसीव्हर...व्हाईट हाऊसने हा ऐतिहासिक फोटो जारी केला आहे. नेतन्याहू या फोटोमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे दिसत आहेत. फक्त बोलतच नाही, तर ते माफी मागत आहेत.
अलिकडेच अमेरिकेने इस्रायल आणि गाझामधील शांततेसाठी एक प्रस्ताव मांडला आहे. दोन्ही बाजूने या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, लवकरच युद्ध समाप्तीची घोषणा होऊ शकते. या प्रस्तावापूर्वी व्हाईट हाउसमध्ये नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्या महत्वपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये नेतन्याहू कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची माफी मागत असल्याचा दावा केला जातोय.
President Donald J. Trump hosts a trilateral phone call with Prime Minister Benjamin Netanyahu of Israel and Prime Minister Mohammed bin Abdulrahman bin Jassim Al Thani of Qatar in the Oval Office. pic.twitter.com/ekbKg3WDZQ
— The White House (@WhiteHouse) September 29, 2025
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी राजधानी दोहा येथे केलेल्या हल्ल्याबद्दल कतारच्या पंतप्रधानांची माफी मागितली. ९ सप्टेंबर रोजी इस्रायलने दोहा येथील हमास कार्यालयावर हल्ला केला होता, ज्यामध्ये काही हमास सदस्य आणि कतारी अधिकारी ठार झाले होते. या इस्रायली हल्ल्यानंतर कतार आणि इस्रायलमधील संबंध बिघडले. यामुळे गाझा शांतता चर्चेतही व्यत्यय आला.
पण, आता (२९ सप्टेंबर २०२५ रोजी) इस्रायली पंतप्रधानांनी कतारच्या पंतप्रधानांची माफी मागितल्यामुळे, दोन्ही देशांमधील संबध पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. ही माफी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या त्रिपक्षीय कॉल दरम्यान मागितली. तसेच, भविष्यात अशा कोणत्याही कृती होणार नाहीत, असे आश्वासनही दिले. विशेष म्हणजे, ही माफी गाझा शांतता करारात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
कतार हा गाझामध्ये हमास आणि इस्रायलमधील मुख्य मध्यस्थ आहे. हल्ल्यानंतर कतारने मध्यस्थी थांबवली होती. मात्र, आता या माफीने कतार पुन्हा चर्चेत सामील झाला आहे. इस्रायलच्या माफीने सौदी अरेबिया आणि युएई सारख्या देशांना ट्रम्पच्या योजनेला पाठिंबा देण्यास प्रोत्साहित केले आहे. इस्रायलच्या माफीनंतर, कतारने ओलिसांच्या सुटकेसाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी हमासवर दबाव वाढवल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच दीर्घ काळापासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची अपेक्षा आहे.