गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:48 IST2025-10-01T06:48:11+5:302025-10-01T06:48:37+5:30
हमासला संघर्ष रोखायचा नसल्यास त्या संघटनेचा नायनाट करणार : ट्रम्प

गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
वॉशिंग्टन डीसी : गाझामधील संघर्ष संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी योजना मांडली आहे. हे युद्ध थांबविण्याची व शस्त्रसंधी करण्याची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात नेतान्याहू यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी इशारा दिला की युद्ध रोखण्याची तयारी हमासने दाखविली नाही, तर त्यांचा कायमचा नायनाट करण्यात येईल.
नेतान्याहू यांनी ट्रम्प यांची अमेरिकेत सोमवारी रात्री भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत गाझा संघर्ष संपविण्याबद्दलच्या २० कलमी योजनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी ट्रम्प म्हणाले की, हमासने ही योजना मान्य केली नाही, तर त्या संघटनेचा नायनाट करण्याचा इस्रायलला संपूर्ण अधिकार आहे. त्यावेळी अमेरिका इस्रायलसोबत असेल. मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांनी सादर केलेली योजना पॅलेस्टिनी व इस्रायली जनतेसह पश्चिम आशियातील लोकांसाठी दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि विकासाचा योग्य मार्ग दाखविते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.
युद्ध थांबविण्याच्या प्रस्तावावर हमासचा विचार सुरू
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्ध संपविण्यासाठी तयार केलेल्या २० कलमी योजनेचा प्रस्ताव हमासला सादर करण्यात आला आहे. आम्ही या योजनेवर विचार करत आहोत असे हमासने म्हटले आहे. कोणताही अंतिम तोडगा मान्य होईपर्यंत आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे.
संघर्ष संपविण्यासाठी २० कलमी योजना खालीलप्रमाणे...
(१) इस्रायल आणि हमास दोघांनी मान्य केले, तर युद्ध तत्काळ थांबवले जाईल.
(२) हमासशी करार झाला, तर इस्रायल आपले सैन्य मागे घेईल.
(३) हमास ओलिस असलेले इस्रायली नागरिक किंवा त्यांचे मृतदेह ७२ तासांमध्ये इस्रायलकडे सोपवेल.
(४) शिक्षा भोगणारे २५० पॅलेस्टिनी नागरिक, गाझातील १७०० नागरिकांची इस्रायल कैदेतून मुक्तता करेल.
(५) प्रत्येक इस्रायली सैनिकाच्या मृतदेहाच्या बदल्यात १५ पॅलेस्टिनी नागरिकांचे मृतदेह परत केले जातील.
(६) हमासचे सर्व तळ आणि शस्त्रसाठा नष्ट केला जाईल.
(७) हमासचा प्रशासनात सहभाग नसेल.
(८) गाझाचा कारभार चालविण्यासाठी एक तात्पुरती प्रशासन समिती.
(९) शांतता मंडळ स्थापन केले जाईल -या मंडळाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः असतील.
(१०) शांतता मंडळ गाझाच्या विकासाबद्दलचे नियोजन करेल, आर्थिक भार उचलेल.
(११) गाझामध्ये मदत तातडीने पुरविण्यासाठी मनुष्यबळ दिले जाईल.
(१२) रोजगार वाढवण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र तयार केले जाईल.
(१३) कोणालाही गाझा सोडण्यास भाग पाडले जाणार नाही. परतीचा मार्ग खुला.
(१४) शांतता राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल तैनात केले जाईल.
(१५) पोलिस दलाला प्रशिक्षण देईल.
(१६) इस्रायल आणि इजिप्तच्या सीमांवरील सुरक्षा बळकट केली जाईल.
(१७) हवाई तसेच तोफखोन्याद्वारे होणारे हल्ले थांबवले जातील.
(१८) मानवी हक्कांचे रक्षण करण्यास आंतरराष्ट्रीय संस्था मदत करतील.
(१९) शांततेसाठी नेतृत्वात थेट चर्चा.
(२०) गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण करणार. विकास आणि चांगले जीवनमान निर्माण करणार.