आयएसआयएसने केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद

By Admin | Updated: September 14, 2014 12:09 IST2014-09-14T09:54:11+5:302014-09-14T12:09:02+5:30

अमेरिकी पत्रकारांचा शिरच्छेद केल्यानंतर आयएसआयएसने आता ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद केला आहे.

ISIS sentenced to death in Britain | आयएसआयएसने केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद

आयएसआयएसने केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. १४ - अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी  संघटनेने शनिवारी ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडीओ जाहीर केला आहे. डेव्हीड हेन्स असे या नागरिकाचे नाव असून ते २०१३ मध्ये सिरियातून बेपत्ता झाले होते. 

सिरिया आणि इराकमधील अनेक भागांवर कब्जा करणा-या आयएसआयएसविरोधात अमेरिकेने मोहीम उघडली आहे. यात अमेरिकेला ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या मोहीमेला सुरुवात झाल्यावर आयएसआयएसने गेल्या महिनाभरात दोन अमेरिकी पत्रकारांचा शिरच्छेद केला होता. हवाई हल्ले न थांबल्यास अशाचपद्धतीने तुमच्या नागरिकांचा शिरच्छेद करु अशी धमकीही आयएसआयएसने दिली होती. 

शनिवारी रात्री उशीरा आयएसआयएसने ब्रिटनचे सामाजिक कार्यकर्ते डेव्हीड हेन्स यांचा शिरच्छेद करतानाचा व्हिडीओ जाहीर केला आहे. दोन मिनीट ४७ सेकंदाचा हा व्हिडीओ 'अमेरिकेला साथ देणा-यांसाठी एक संदेश' या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओत शिरच्छेद करणारा दहशतवादी ब्रिटनला धमकी देताना दिसत आहे. 'अमेरिकेला नकार देण्याचे सामर्थ्य ब्रिटनमध्ये नाही. अमेरिकेला साथ देणं हे ब्रिटनच्या विनाशाला गती देणारं असून यापुढेही ब्रिटनच्या नागरिकांचा अशाच पद्धतीने शिरच्छेद केला जाईल' असे या दहशतवाद्याने म्हटले आहे.

 

स्कॉटलंडमध्ये जन्मलेले ४४ वर्षीय डेव्हीड हेन्स यांचे २०१३ मध्ये सिरिया येथे अपहरण झाले होते. हेन्स हे एजन्सी फॉर टेक्निकल को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेसाठी काम करत होते. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरुन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या क्रूरकृत्याचा तीव्र निषेध दर्शवला आहे. 

Web Title: ISIS sentenced to death in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.