इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब इस्रायलच्या हल्ल्यात ठार; लेबेनॉनवर जबरदस्त हल्ला, १२ ठार; उद्विग्न ट्रम्प म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 06:44 IST2026-03-19T06:43:19+5:302026-03-19T06:44:10+5:30
इस्रायलने लेबनॉनमधील बैरूतवर केलेल्या हल्ल्यांत १२ जण ठार झाले.

इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब इस्रायलच्या हल्ल्यात ठार; लेबेनॉनवर जबरदस्त हल्ला, १२ ठार; उद्विग्न ट्रम्प म्हणाले...
दुबई : इराणचे गुप्तचर खात्याचे मंत्री इस्माईल खातिब यांना ठार केल्याची माहिती इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी बुधवारी दिली. त्याला इराणनेही दुजोरा दिला. इराणने इस्रायल व सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांवर बुधवारी जोरदार प्रतिहल्ले चढविले. तर, इस्रायलने लेबनॉनमधील बैरूतवर केलेल्या हल्ल्यांत १२ जण ठार झाले.
सायबर हल्ले आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे आरोप करत अमेरिकेने २०२२मध्ये इस्माईल खातिब यांच्यावर अनेक निर्बंध लादले होते. इराणच्या गुप्तचर कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा, तसेच अनेक वादग्रस्त कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता. इराणने बुधवारी केलेले बहुतांश हल्ले इस्रायलने हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून फोल ठरविले. मात्र, इराणच्या हल्ल्यात इस्रायलच्या तेल अवीवमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी, निमलष्करी संघटना बसीजचे प्रमुख घोलामा रेजा सोलेमनी मारले गेल्यानंतर तो देश अधिक आक्रमक झाला आहे.
आम्ही स्वबळावर युद्ध लढू : डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन : नाटो आणि बहुतांश सहयोगी देशांनी होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी मदत करण्याच्या आवाहनावर नकारघंटा वाजविल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आहेत. कोणाच्याही मदतीची आम्हाला गरज नाही. आम्ही एकट्याच्या बळावर युद्ध लढू असे ते म्हणाले. जगाच्या भल्यासाठी आम्ही हे युद्ध लढत आहोत असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प विरोधात अमेरिकेत असंतोष
इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाच्या निषेधार्थ अमेरिकेच्या नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर (एनसीटीसी)चे संचालक जो केंट यांनी राजीनामा दिला. त्याचे पडसाद अमेरिकेत उमटले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याची भावना त्यांचे सहकारी व विविध राज्यांमध्ये वाढत असल्याचे सांगण्यात येते.
जोन्स ॲक्ट ट्रम्पकडून शिथिल
अमेरिकेचा तेल खर्च कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शंभर वर्ष जुन्या जोन्स ॲक्टमधील नियमांबाबत ६० दिवसांची सूट दिली आहे. त्यामुळे अमेरिकेतील बंदरांमधून पाठवलेल्या वस्तूंची केवळ अमेरिकी ध्वज असलेल्या जहाजांतूनच वाहतूक केली जाऊ शकते. या कायद्यामुळे तेल, वायूच्या किंमती वाढतात असा नेहमी आक्षेप घेतला जातो. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी व्हेनेझुएला सरकारच्या तेल आणि वायू कंपनीवर घातलेले निर्बंध बुधवारी शिथिल केले.
सर्वात मोठा वायू प्रकल्प लक्ष्य
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, अमेरिका व इस्रायलने इराणच्या दक्षिणेकडील ‘साउथ पार्स’ वायू क्षेत्र आणि असालुयेह शहरातील तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले. ‘साउथ पार्स’ हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र मानले जाते. या हल्ल्यात वायू क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांनाच नव्हे, तर पेट्रोकेमिकल, तेल सुविधांनाही लक्ष्य केले. इस्रायली प्रसारमाध्यमांनी बुशेहर भागातील एका वायू सुविधेवरही हल्ला झाल्याचे वृत्त दिले आहे.