इराणमध्ये प्रवासी विमान कोसळले, 66 प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 18:21 IST2018-02-18T17:39:19+5:302018-02-18T18:21:29+5:30
इराणचे एक प्रवासी विमान अपघातग्रस्त झाले आहे. या अपघातामध्ये 66 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान इराणमधील तेरहान येथून यासूजच्या दिशेने जात होते.

इराणमध्ये प्रवासी विमान कोसळले, 66 प्रवाशांचा मृत्यू
तेरहान - इराणचे एक प्रवासी विमान अपघातग्रस्त झाले आहे. या अपघातामध्ये 66 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान इराणमधील तेरहान येथून यासूजच्या दिशेने जात होते. तेरहान येथील मेहरबाद इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर दक्षिण इराणमध्ये विमानाला अपघात झाल्याची माहिती इराणमधील असेमन एअरलाइन्सने दिली.
असेमन एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, "अपघातग्रस्त विमानामधून एका मुलासह 60 प्रवासी आणि 6 कर्मचारी प्रवास करत होते. दोन इंजिन असलेल्या या विमानाचा वापर कमी अंतरावरील प्रवासासाठी केला जात होता. दरम्यान, खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत."अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा आकाशात धुके होते. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इराणकडे असलेली बहुतांश विमाने जुनी झाली आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून तेथे विमान अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी इराणने एअरबस आणि बोईंगसोबत विमानखरेदीसाठी करार केले आहेत.