युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 08:11 IST2026-04-09T08:06:31+5:302026-04-09T08:11:36+5:30
लेबनॉनवर सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील पेच वाढला असून इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे.

युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
Iran FM Araghchi Flags Attack on Lebanon: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता एक मोठी घडामोडी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेला आता एकतर युद्ध निवडावं लागेल किंवा युद्धविराम, असे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इस्रायलच्या माध्यमातून लेबनॉनमध्ये युद्ध सुरू ठेवणे आणि इराणसोबत शांततेची भाषा करणे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू शकणार नाहीत, अशा शब्दांत इराणने आपला भूमिका जाहीर केली आहे.
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. मात्र, या कराराच्या व्याप्तीवरून आता वाद सुरु झाला आहे. इराणचा असा दावा आहे की, या युद्धविरामात संपूर्ण प्रदेशातील शांततेचा समावेश आहे, तर अमेरिका आणि इस्रायलने लेबनॉन या कराराचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इराणचा प्रहार
अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अमेरिकाला इशारा दिला. "इराण-अमेरिका युद्धविरामाच्या अटी स्पष्ट आहेत. अमेरिकेला आता निवड करावी लागेल एकतर संपूर्ण युद्धविराम किंवा इस्रायलच्या माध्यमातून सुरू असलेले युद्ध. दोन्ही गोष्टी एकत्र शक्य नाहीत. लेबनॉनमधील नरसंहार जग पाहत आहे. चेंडू आता अमेरिकेच्या कोर्टात आहे," असं अराघची म्हणाले.
लेबनॉन करारात नाहीच; व्हाईट हाऊसची भूमिका
दुसरीकडे, अमेरिकेने इराणचा हा दावा फेटाळून लावला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, लेबनॉनमधील कारवाया या इराणसोबतच्या युद्धविरामाचा भाग नाहीत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एका मुलाखतीत सांगितले की, हिजबुल्लाहमुळे लेबनॉनला या करारात स्थान दिलेले नाही. त्या प्रश्नाचा निकाल नंतर लावला जाईल.
इस्रायलचा आक्रमक पवित्रा; हिजबुल्लाहवर प्रहार सुरूच
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ले स्थगित करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र, त्यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरुद्ध सुरू असलेली लष्करी मोहीम थांबणार नाही.
इस्लामाबादमध्ये महत्त्वाची चर्चा
या तणावाच्या पार्श्वभूमीवर, येत्या शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे ऐतिहासिक शांतता चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ रवाना होणार आहे. यामध्ये विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ज्येष्ठ सल्लागार जॅरेड कुशनर यांचाही समावेश असेल.