जमिनीवरून हल्ला झाल्यास आखातात पेरणार स्फोटके; इराणने दिला अमेरिका-इस्रायलला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:07 IST2026-03-24T12:07:53+5:302026-03-24T12:07:53+5:30
अमेरिका त्यांच्या मरीन दलाला इराणच्या भूमीवर तैनात करण्याची वृत्ते येत असल्याने इराणने हा इशारा दिला आहे.

जमिनीवरून हल्ला झाल्यास आखातात पेरणार स्फोटके; इराणने दिला अमेरिका-इस्रायलला इशारा
दुबई : अमेरिका व इस्रायलच्या लष्कराने त्यांचे सैनिक इराणच्या भूमीवर उतरवून हल्ले सुरू केल्यास संपूर्ण आखातात समुद्रात सागरी स्फोटके (माइन्स) पेरण्याचा इशारा इराणच्या संरक्षण परिषदेने सोमवारी दिला.
अमेरिका त्यांच्या मरीन दलाला इराणच्या भूमीवर तैनात करण्याची वृत्ते येत असल्याने इराणने हा इशारा दिला आहे. इराणच्या संरक्षण परिषदेने म्हटले आहे की, इराणच्या किनारपट्टी किंवा बेटांना लक्ष्य करण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर लष्करी रणनीतीनुसार आखात आणि किनारी भागातील सर्व प्रवेशमार्ग सागरी स्फोटकांनी भरून टाकले जातील.
अमेरिका-इस्रायलच्या हालचाली सुरू
आखाताचा महत्त्वाचा प्रवेशमार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून ऊर्जा पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. या मोहिमेला पाठबळ देण्यासाठी अमेरिकेचे मरीन दल इराणच्या बेटांवर किंवा किनारी भागांवर कारवाई करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलनेही युद्धादरम्यान जमिनीवरून हल्ल्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे या संघर्षाचे स्वरूप अधिक व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मित्र राष्ट्रांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली : इराण
कोलंबो : होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद नसून ती मित्र राष्ट्रांसाठी खुली आहे, असे श्रीलंकेतील इराणचे राजदूत अलीरेझा देलखोश यांनी सोमवारी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास श्रीलंकेला तेल आणि इतर अत्यावश्यक वस्तू पुरवण्याची तयारी इराणने दर्शवली आहे. श्रीलंका हा आमचा मित्र देश आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी श्रीलंकेसारख्या देशांसाठी बंद नाही. मागणी केल्यास इराण तेल किंवा इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा श्रीलंकेला करेल असे देलखोश यांनी स्पष्ट केले.
देलखोश यांनी इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याबाबतही मत व्यक्त केले. आमची नौका युद्धासाठी नव्हती तर ती भारतात ‘मिलन’ या बहुदेशीय नौदल सरावात सामील होऊन परत येत होती. अमेरिकेने हा हल्ला करून मानवतावादी कायद्याचे उल्लंघन केले असा आरोप त्यांनी केला.