इराण युद्ध जवळजवळ संपले, तेल पुरवठा थांबवू देणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:36 IST2026-03-10T08:15:47+5:302026-03-10T08:36:50+5:30
ट्रम्प म्हणाले की, इराण मध्य पूर्वेवर कब्जा करण्याचा आणि इस्रायलचा नाश करण्याचा कट रचत आहे. "आम्ही ते वेळीच थांबवले. आम्हाला त्यात सहभागी असल्याचा खूप अभिमान आहे." जर इराणने जागतिक तेल पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला तर त्याला यापेक्षाही कठोर शिक्षा भोगावी लागेल, यातून तो कधीही सावरणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.

इराण युद्ध जवळजवळ संपले, तेल पुरवठा थांबवू देणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे.अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ले केले, या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले. पण यामध्ये त्यांनी कालावधी सांगितला नाही. "आम्ही हे देखील संपवण्याच्या अगदी जवळ आहोत." मी कोणत्याही दहशतवादी राजवटीला जगाला ओलीस ठेवू देणार नाही आणि जागतिक तेल पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करू देणार नाही. जर इराणने असे काही केले तर त्यांना यापेक्षाही कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
युद्ध लवकरच संपेल या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टिप्पणीनंतर तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. 'लवकरच' म्हणजे एका आठवड्यात असे विचारले असता, ट्रम्प यांनी उत्तर दिले, "नाही, पण मला वाटते लवकरच. इस्लामिक रिपब्लिकचे सैन्य पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.
मध्य पूर्व ताब्यात घेण्याची योजना
"इराण मध्य पूर्व ताब्यात घेण्याची आणि इस्रायल नष्ट करण्याची योजना आखत आहे. आम्ही ते वेळीच थांबवले. आम्हाला त्यात सहभागी झाल्याचा खूप अभिमान आहे. अमेरिकेने सध्या इराणमधील काही वीज निर्मिती केंद्रांना लक्ष्य दिलेले नाही, पण जर इराणने सहकार्य केले नाही तर ते पुन्हा ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करतील, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
इराण युद्धाबाबत फ्लोरिडामध्ये पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, "आम्ही काही सर्वात महत्त्वाची लक्ष्ये नंतरसाठी सोडली आहेत, जेणेकरून गरज पडल्यास त्यांचा वापर करता येईल. जर आपण त्या लक्ष्यांवर हल्ला केला तर त्यांना पुन्हा बांधण्यासाठी अनेक वर्षे लागतील. ही लक्ष्ये वीज निर्मिती आणि इतर अनेक गोष्टींशी संबंधित आहेत. आवश्यकतेशिवाय आम्ही ते करणार नाही."
तेलाच्या किमती कमी होतील
युद्धामुळे इराणने जागतिक शिपिंग आणि तेल पुरवठ्याला निर्माण केलेला धोका निष्प्रभ होईल. यामुळे तेलाच्या किमती कमी होतील आणि अमेरिकन कुटुंबांसाठी तेल आणि वायूच्या किमती कमी होतील, असा ट्रम्प यांनी दावा केला. या अल्पकालीन व्यत्ययादरम्यान, अमेरिका आखातात कार्यरत असलेल्या सर्व टँकरना राजकीय जोखीम विमा देत असल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. अमेरिका किमती कमी करण्यासाठी काही तेल-संबंधित निर्बंध शिथिल करत आहे, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.