इराण अमेरिकेसोबत अणु चर्चा करण्यास तयार, पण...; काय आहे त्यांची 'ही' मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 09:13 IST2025-07-11T09:12:58+5:302025-07-11T09:13:16+5:30

Iran America On Nuclear : अमेरिका आणि इराण यांच्यातील अणू कराराच्या चर्चेला पुन्हा एकदा ग्रहण लागलं आहे.

Iran ready for nuclear talks with US, but...; What is their 'this' demand? | इराण अमेरिकेसोबत अणु चर्चा करण्यास तयार, पण...; काय आहे त्यांची 'ही' मागणी?

इराण अमेरिकेसोबत अणु चर्चा करण्यास तयार, पण...; काय आहे त्यांची 'ही' मागणी?

अमेरिका आणि इराण यांच्यातील अणू कराराच्या चर्चेला पुन्हा एकदा ग्रहण लागलं आहे. इराणने चर्चेसाठी तयारी दर्शवली असली, तरी एक मोठी आणि धक्कादायक अट ठेवली आहे. "जोपर्यंत अमेरिका पुन्हा हल्ला करणार नाही, याची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत चर्चा नाही," अशी भूमिका इराणने घेतली आहे. याशिवाय, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचीही मागणी इराणने केली आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी एका फ्रेंच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात अमेरिकेने इराणच्या अणु-केंद्रांवर बॉम्ब हल्ला केला होता, ज्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं.

'डिप्लोमसीचा मार्ग खुला, पण जबाबदारी घ्यावी लागेल!'

अरागची यांनी स्पष्ट केलं की, "डिप्लोमसीचा मार्ग बंद झालेला नाही, पण हा दुतर्फा रस्ता आहे. अमेरिकेला त्यांच्या कृतींची जबाबदारी घ्यावी लागेल, विशेषतः त्यांनी अलीकडेच इराणच्या अणु-केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांची."

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यालाही अरागची यांनी फेटाळून लावलं, ज्यात ट्रम्प म्हणाले होते की, हवाई हल्ल्यांमध्ये इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रॉसी यांचा हवाला देत अरागची म्हणाले, "अणु कार्यक्रम फक्त काही महिन्यांसाठी थांबला आहे." ते पुढे म्हणाले, "अमेरिकेच्या हल्ल्यामुळे आमच्या शांततापूर्ण अणु-केंद्रांना गंभीर नुकसान झाले आहे. आम्ही अजूनही त्याचे मूल्यांकन करत आहोत. भरपाई मागण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे."

अणु कार्यक्रम थांबणार नाही!

इराणने आपला अणु कार्यक्रम थांबवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. "आपल्या ऊर्जा, वैद्यकीय आणि शेतीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अणु कार्यक्रमाला आम्ही सोडून देऊ, हे मानणे चुकीची कल्पना आहे," असे अरागची म्हणाले. इराणच्या अणु-गतिविधी IAEAच्या देखरेखीखाली असून, त्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करतात, यावरही त्यांनी भर दिला.

"इच्छाशक्तीने मिळवलेली प्रगती बॉम्बने संपवली जाऊ शकत नाही," असे म्हणत त्यांनी पाश्चिमात्य देशांवर निशाणा साधला. "IAEAच्या देखरेखीखाली असलेल्या अणु-केंद्रावर एखाद्या पाश्चिमात्य देशाने हल्ला करणे, म्हणजे कायद्यावरच हल्ला करण्यासारखे आहे," असे अरागची यांनी ठणकावून सांगितले. या भूमिकेमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील अणू चर्चा पुन्हा एकदा गुंतागुंतीची झाली आहे. 

Web Title: Iran ready for nuclear talks with US, but...; What is their 'this' demand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.