इराणचा मास्टरस्ट्रोक! जगात अमेरिकेला एकाकी पाडायची रणनीती? ट्रम्प यांच्या दाव्यावर फेरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 09:08 IST2026-03-25T09:06:50+5:302026-03-25T09:08:18+5:30
इराणच्या या दाव्याने ट्रम्प प्रशासन नेमके कोणाशी बोलले याबद्दल संभ्रमावस्था आहे.

इराणचा मास्टरस्ट्रोक! जगात अमेरिकेला एकाकी पाडायची रणनीती? ट्रम्प यांच्या दाव्यावर फेरले पाणी
दुबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर पाच दिवस हल्ले करणार नाही, अशी सोमवारी माहिती दिली होती व इराणच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता. पण या दाव्यावर संशय निर्माण झाला आहे.
इराणच्या परराष्ट्र खात्याने ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता. आता मंगळवारी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालीबाफ यांनी चर्चा झाल्याची माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी युद्धाबाबतची आमची चर्चा अझरबैजान, इजिप्त, ओमान, पाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया, तुर्की आणि तुर्कमेनिस्तान या देशांशी झाल्याचे म्हटले आहे.
इराणच्या या दाव्याने ट्रम्प प्रशासन नेमके कोणाशी बोलले याबद्दल संभ्रमावस्था आहे. ट्रम्प यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अधिकारी इराणच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत, असे म्हटले होते. त्यावर पत्रकारांनी कोणाशी असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी वरिष्ठ नेत्यांशी ज्यांचे नाव आपण सांगू शकत नाही, असे उत्तर दिले होते. त्यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्याशी चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले होते. ट्रम्प यांनी होर्मुझचे नियंत्रण अमेरिका व इराणच्या नेत्यांमध्ये विभागले जाईल असा दावा केला होता.
इराणच्या राजदूताला देश सोडण्याचे आदेश
लेबनॉन सरकारने मंगळवारी इराणच्या राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना ‘पर्सोना नॉन ग्राटा’ (एखाद्या देशाला नको असणारी व्यक्ती आदेश) घोषित करत देश सोडण्यास सांगितले आहे. पण, लेबनॉनमध्ये इराणचा दूतावास कार्यरत राहील, तेथे कार्यवाह प्रमुख असेल असे लेबनॉनने म्हटले आहे. इराणचे लेबनॉनमधील बंडखोर शिया संघटना हिजबुल्लाशी संबंध असल्याच्या आरोपावरून ही कारवाई झाली आहे.
अमेरिकेशी चर्चेसाठी कालीबाफ यांचे नाव? पण अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचा इन्कार
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालीबाफ यांचे नाव संभाव्य चर्चाकर्ते म्हणून पुढे येत असल्याच्या वृत्तांना वेग आला आहे. मात्र, खुद्द कालीबाफ यांनी अमेरिकेशी कोणतीही चर्चा सुरू असल्याचा इन्कार केला आहे. इराणमध्ये सत्तेची अनेक केंद्रे सक्रिय असल्याने, चर्चेसाठी अंतिम निर्णय कोण घेणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कालीबाफ यांनी अमेरिकेशी युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट केले होते. खोटी माहिती पसरवून आर्थिक व तेल बाजारावर परिणाम करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असाही आरोप त्यांनी केला होता.
‘प्रस्ताव हेगसेथनी दिला’
वॉशिंग्टन : अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी दिला होता, असा खुलासा केला. त्यासाठी हेगसेथ, तसेच ‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’चे जनरल डॅन केन यांच्यांशी चर्चा केली होती असे ट्रम्प म्हणाले. मलाही गेली ४७ वर्षे हा देश दहशतवादाला प्रोत्साहन देत असून तो अण्वस्त्रेही तयार करत असल्याचे माहीत असल्याने इराणवर ठोस कारवाई करण्याची गरज वाटली असे ट्रम्प म्हणाले.