होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:05 IST2026-04-11T08:05:29+5:302026-04-11T08:05:52+5:30

इराणच्या नौदलाने एलएनजी टँकरला माघारी धाडले; ड्रोनहल्ले झाल्याचे एकमेकांवर आरोप

Iran maintains control over the Strait of Hormuz, toll collection continues; 6 ships depart | होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना

न्यू यॉर्क : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण अद्यापही कायम असल्याचे दिसून आले. शुक्रवारी ‘निडी’ नावाचा बोत्सवानाचा ध्वज असलेला एक एलएनजी टँकर इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सने ठरवून दिलेल्या मार्गावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, अचानक त्याला माघारी फिरावे लागले. या घटनेमुळे या सागरी मार्गावर इराणची लष्करी जरब आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नौवहन माहिती देणारी कंपनी ‘केप्लर’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी केवळ चार टँकर आणि तीन मालवाहू जहाजांनी या सामुद्रधुनीतून प्रवास केला. युद्धविराम लागू झाल्यापासून येथून प्रवास करणाऱ्या जहाजांची एकूण संख्या आता १२ वर पोहोचली आहे. शांततेच्या काळात या मार्गावरून दररोज १०० पेक्षा जास्त जहाजे जात असत, त्या तुलनेत ही संख्या अत्यंत नगण्य आहे. 

युनायटेड अरब अमिरातीच्या प्रमुख तेल कंपनीचे प्रमुख सुलतान अल-जाबेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २३० तेलवाहू जहाजे सध्या सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी ताटकळत उभी आहेत. इराणने कोणत्याही अटीशिवाय हा मार्ग तातडीने खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कुवेतवर इराणचे हल्ले

युद्धविरामासंदर्भात चर्चा होत असताना गुरुवारी रात्री इराण आणि त्यांच्या समर्थित गटांनी कुवेतच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून ड्रोनहल्ले केल्याचा खळबळजनक आरोप कुवेतने  केला आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियानेदेखील इराणच्या हल्ल्यांमध्ये त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘ईस्ट-वेस्ट’ पाइपलाइनचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे.

आरोप इराणने फेटाळला

इराणने पर्शियन आखातातील देशांवर गुरुवारी कोणत्याही प्रकारचे हल्ले केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘इर्ना’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, जर प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली ही वृत्ते खरी असतील, तर हे कृत्य निःसंशयपणे ‘झिओनिस्ट शत्रू’ (इस्रायल) किंवा अमेरिकेचेच आहे, असा थेट आरोप केला आहे.

युद्धविरामाच्या यशावर डोनाल्ड ट्रम्प यांची शंका

ट्रम्प यांनी या युद्धविराम कराराच्या यशावर पुन्हा एकदा तीव्र शंका उपस्थित केली आहे. ट्रम्प यांनी तेल वाहतुकीच्या बाबतीत इराणचे वर्तन अत्यंत निराशाजनक आहे. काही लोक याला लाजिरवाणे म्हणतील, असे म्हटले आहे. आमच्यात तेलवाहतुकीचे अधिकार इराणला देण्याबाबत असा कोणताही करार झालेला नाही, इराणने टोलवसुली तत्काळ थांबवावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : होर्मुज जलडमरूमध्य पर ईरान की पकड़ मजबूत, टोल वसूली जारी

Web Summary : युद्धविराम वार्ता के बावजूद, ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य पर नियंत्रण बनाए रखा है, जिससे टैंकरों का मार्ग बाधित हो रहा है और टोल वसूला जा रहा है। कुवैत और सऊदी अरब ने ईरान पर हमलों का आरोप लगाया है, जिसे ईरान ने खारिज कर दिया है और इज़राइल या अमेरिका को दोषी ठहराया है। ट्रम्प को युद्धविराम की सफलता पर संदेह है।

Web Title : Iran Tightens Grip on Hormuz Strait, Toll Collection Continues

Web Summary : Despite ceasefire talks, Iran maintains control over the Strait of Hormuz, hindering tanker passage and collecting tolls. Kuwait and Saudi Arabia accuse Iran of attacks, which Iran denies, blaming Israel or the US. Trump doubts ceasefire success.