होर्मुझमध्ये इराणची ‘टोल वसुली’; प्रत्येक जहाजावर आकारतोय 20 कोटींचा टोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:37 IST2026-03-20T16:36:56+5:302026-03-20T16:37:26+5:30
Iran Crisis: या मार्गातून आतापर्यंत 9 जहाजांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे.

होर्मुझमध्ये इराणची ‘टोल वसुली’; प्रत्येक जहाजावर आकारतोय 20 कोटींचा टोल
Iran Crisis: अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) जाणाऱ्या जहाजांकडून मोठ्या प्रमाणावर टोल आकारण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण प्रति जहाज सुमारे 2 मिलियन डॉलर्स (अंदाजे 20 कोटी रुपये) इतका टोल आकारत आहे. इतिहासात प्रथमच हॉर्मुज मार्गावर असा शुल्क आकारला जात असल्याचे सांगितले जात आहे.
लॉइड इंटेलिजन्सचा अहवाल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉइड इंटेलिजन्स इंस्टिट्यूटच्या अहवालानुसार, फारसच्या आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने हॉर्मुजजवळ ‘सुरक्षित मार्ग’ (सेफ कॉरिडॉर) तयार केला आहे. हा मार्ग लारक बेटाजवळ असून, या मार्गातून आतापर्यंत 9 जहाजांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी एका जहाजाने 2 मिलियन डॉलर टोल भरल्याची पुष्टी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, इराणकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
भारत, चीन, पाकिस्तानच्या जहाजांचा समावेश
या सुरक्षित मार्गातून बाहेर काढलेल्या जहाजांमध्ये भारत, चीन, पाकिस्तान आणि मलेशिया या देशांच्या जहाजांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मात्र, नेमक्या किती जहाजे कोणत्या देशांची होती, याची तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही.
मित्र देशांनाच परवानगी- इराण
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी संकेत दिले की, इराण फक्त ‘मित्र आणि सहानुभूती असलेल्या’ देशांच्या जहाजांनाच मार्ग देत आहे. दुसरीकडे, अमेरिका हॉर्मुजवरील इराणचा प्रभाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
टोल आकारण्यामागील उद्देश काय?
तज्ज्ञांच्या मते, इराणच्या या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, आर्थिक आणि राजकीय दबाव निर्माण करणे. इराणचे खासदार मोहम्मद मुखबेर यांनी स्पष्ट केले की, ज्या मार्गांवर आमचा अधिकार आहे, तेथे आम्ही कर आकारणारच. ज्यांनी आमच्यावर निर्बंध लादले आहेत, त्यांना हा कर भरावा लागेल.
दुसरे कारण म्हणजे, हॉर्मुजवरील नियंत्रण दाखवणे. अमेरिकेकडून इराणी लष्करी तळांवर कारवाईच्या इशाऱ्यांनंतर इराण हा टोल लावून हॉर्मुजवरील आपले नियंत्रण कायम असल्याचा संदेश देत आहे.