Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:36 IST2025-06-15T13:35:36+5:302025-06-15T13:36:46+5:30

Israel Iran War News: इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमाची केंद्रे आणि लष्करी यंत्रणांवर जोरदार हल्ला केला.

Iran claims to have ‘solid proof’ of US backing Israeli strikes | Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 

Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 

दुबई: इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमाची केंद्रे आणि लष्करी यंत्रणांवर जोरदार हल्ले केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने शनिवारी सकाळी इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांत किमान तीन लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. अण्वस्त्र कार्यक्रमावर निर्बंध घालणाऱ्या करारासाठी इराणने लवकरात लवकर वाटाघाटी कराव्यात, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ते म्हणाले की, विनाशापासून वाचवण्याची इराणला ही दुसरी संधी मिळाली आहे. अन्यथा खूप काही होण्याची शक्यता आहे.

इराणच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूतांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांत ७८ लोक ठार तर ३२० पेक्षा जास्त जखमी झाले. इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर शनिवारी अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ले केले. मात्र इराणचे हल्ले परतवून लावल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने हल्ला केल्यामुळे आता अमेरिकेबरोबर अणुकराराविषयी होणारी चर्चा अर्थहीन ठरणार असल्याचे इराणने म्हटले आहे. उद्या रविवारी ओमानमध्ये ही चर्चा होणार असून ती रद्द केल्याचे अद्याप जाहीर झालेले नाही.

इराणमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली
इराणने शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी पहाटे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यात इस्रायलमधील तीन नागरिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले. त्यांच्यावर तेल अवीवमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. इराणमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे आग लागल्याचे सांगण्यात आले. इराणने शनिवारी केलेल्या हल्ल्यांत इस्रायलमधील तेल अवीव शहरात ३४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. पण इस्रायलने जखमींचा नेमका आकडा अद्याप जाहीर केलेला नाही. 

मोठे युद्ध होण्याची भीती
इस्रायलच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे आणि इराणच्या प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशांमध्ये मोठे युद्ध होण्याची भीती वाढली आहे. इराणवर हल्ला करण्याचा इशारा इस्रायलने खूप आधीच दिला होता. इस्रायल - इराण संघर्षामुळे मध्य पूर्वेतील प्रमुख आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मात्र जॉर्डनने शनिवारी सकाळी ७:३० वाजता प्रवासी विमान वाहतुकीसाठी आपली हवाई हद्द पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेतला. लेबनॉन सरकारनेही शनिवारी आपली हवाई हद्द आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी खुली केली आहे.

Web Title: Iran claims to have ‘solid proof’ of US backing Israeli strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.