इंडोनेशियामध्ये एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'एपी'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या मुख्य जावा बेटावर एका प्रवासी बसला झालेल्या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शोध आणि बचाव मोहिमेचे प्रमुख बुडिओनो यांनी सांगितलं की, ३४ प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस टोल रोडवर धावत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस एका सिमेंटच्या बॅरियरला धडकली. ही बस देशाची राजधानी जकार्ता येथून 'योग्यकार्ता'कडे जात होती. जावामधील सेमारांग शहरात असलेल्या क्रापयाक टोल मार्गावरील एका वळणदार एक्झिट रॅम्पवर ही बस अचानक उलटली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक ४० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुरुवातीला सहा प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले, ज्यांचा जागीच मृत्यू झाला होता. बुडिओनो यांनी पुढे माहिती दिली की, इतर १० जणांचा रुग्णालयात नेत असताना किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या १८ जखमींवर दोन जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी ५ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून १३ जणांची प्रकृती गंभीर आहे.
इंडोनेशियातील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या दृश्यांमध्ये पिवळ्या रंगाची बस एका बाजूला उलटलेली दिसत आहे. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिक नागरिक मदतकार्यासाठी घटनास्थळी जमले आहेत, तर रुग्णवाहिकांमधून मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात हलवलं जात आहे.