सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 18:48 IST2025-12-14T15:13:46+5:302025-12-14T18:48:49+5:30
Bondi Beach Shooting Australia: गोळीबाराच्या वेळी बॉन्डी बीचवर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिक समुद्रकिनाऱ्यावर आराम करत असताना ही घटना घडली.

सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराला हादरवून सोडणारी एक मोठी घटना समोर आली आहे. सिडनीच्या सुप्रसिद्ध आणि गजबजलेल्या बॉन्डी बीचवर शनिवारी (१४ डिसेंबर २०२५) एका अज्ञात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.
गोळीबाराच्या वेळी बॉन्डी बीचवर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिक समुद्रकिनाऱ्यावर आराम करत असताना ही घटना घडली. काही अज्ञात व्यक्तींनी अचानक जमावावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यामुळे बीचवर एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी घाबरून सैरावैरा धावण्यास सुरुवात केली.
या गोळीबारात किती लोक जखमी झाले, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र जखमींची संख्या मोठी असल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस आणि आपत्कालीन सेवा दल बॉन्डी बीचवर दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही हल्लेखोर गोळीबार करून घटनास्थळावरून फरार झाले आहेत, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
बॉन्डी बीच हे केवळ सिडनीतीलच नव्हे, तर जगभरातील एक मोठे पर्यटन स्थळ आहे. अशा शांततापूर्ण ठिकाणी गोळीबार झाल्यामुळे संपूर्ण सिडनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.