सौदीला जाणारं विमान अचानक 'कराची'त उतरवलं; पाकिस्तानने वाचवला एका भारतीयाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:51 IST2024-12-14T13:50:44+5:302024-12-14T13:51:37+5:30
१३ डिसेंबरच्या रात्री ९.१५ मिनिटांनी हे विमान दिल्लीहून उडाले होते. रात्री ११ च्या सुमारास विमानाने कराचीत लँडिंग केले.

सौदीला जाणारं विमान अचानक 'कराची'त उतरवलं; पाकिस्तानने वाचवला एका भारतीयाचा जीव
कराची - शुक्रवारी रात्री नवी दिल्लीहून सौदी अरबला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं पाकिस्तानातील कराचीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. मेडिकल इमरजेंसीमुळे पाकिस्तानच्या कराची येथील जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्टवर हे विमान उतरवण्यात आले. सकाळी या विमानाने सौदी अरबसाठी उड्डाण घेतले होते.
पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करताच विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडली. ऑक्सिजन दिल्यानंतरही तब्येत सुधारली नव्हती. प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहताच विमानाच्या पायलटनं कराचीतील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने कराचीतील एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोलने भारतीय विमानाला लँडिंगची परवानगी दिली. यावेळी एअरपोर्टवरील मेडिकल सुविधेसाठी असणाऱ्या स्टाफने विमानाचे लँडिंग होताच आजारी प्रवाशावर उपचार सुरू केले. ज्या प्रवाशाची तब्येत खराब झाली त्यांचे वय ५५ होते.
१३ डिसेंबरच्या रात्री ९.१५ मिनिटांनी हे विमान दिल्लीहून उडाले होते. रात्री ११ च्या सुमारास विमानाने कराचीत लँडिंग केले. ३ तासानंतर १.५५ च्या सुमारास कराचीतून हे विमान पुन्हा दिल्लीकडे आले. पाक मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ५५ वर्षीय पुरुष प्रवासी पाकिस्तानी हवाई हद्दीत असताना गंभीर आजारी पडले. त्या व्यक्तीची प्रकृती पाहून इंडिगो फ्लाइटच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला ऑक्सिजन दिला पण त्याची प्रकृती सुधारली नाही उलट ती आणखी बिघडली. मानवतावादी आधारावर निर्णय घेत वैमानिकाने कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून परवानगी मिळाल्यानंतर विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आले.
पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या वैद्यकीय पथकाने तात्काळ विमानात चढून प्रवाशाला वैद्यकीय सुविधा पुरवल्या त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर झाली. पाकिस्तानी मीडियानुसार, आजारी प्रवाशाला औषधेही देण्यात आली आहेत. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर विमानाने कराचीहून उड्डाण केले आणि सौदीला जाण्याऐवजी दिल्लीला परतले.