भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काल रात्री पाकिस्तानने भारतातील १५ ठिकाणांना लक्ष्य करत केलेला हल्ला उधळून लावण्यात आला होता. त्यानंतर भारताच्या सैन्यदलाने आज ड्रोन हल्ला करत पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टिम आणि रडार प्रणाली उद्ध्वस्त केली. यादरम्यान, एक ड्रोन पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला धडकल्याचं वृत्त आहे. यामध्ये स्टेडियमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
पाकिस्तानने काल रात्री भारतातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पाकिस्तानने सोडलेली रॉकेट हवेतच उद्ध्वस्त करत एस-४०० सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानचा डाव हाणून पाडला होता. त्यानंतर भारताने प्रत्युत्तरदाखल हल्ला करत पाकिस्तानमधील एचक्यू-९ ही हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केली. भारताने बुधवारी रात्रीही अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे, असा दावा केला आहे. भारताने इस्रायली हारोप ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला. हे हल्ले लाहोर, कराची, गुजरांवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली आणि चोर या शहरांमध्ये हल्ले केल्याचा दावा करण्यात येत आहे.रावळपिंडीमधील या स्टेडियममध्ये पाकिस्तान सुपर लीगचा सामना खेळवण्यात येणार होता. तत्पूर्वीच भारतीय सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान, एक ड्रोन या स्टेडियमवर जाऊन धडकले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, रावळपिंडी येथील स्टेडियमचं ड्रोन हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. तसेच येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचं आयोजनही संकटात सापडले आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.