भारतीयांनो, ना घंटा वाजेल, ना गवत उगवेल; पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:13 IST2023-03-28T08:59:07+5:302023-03-28T09:13:35+5:30
शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे.

भारतीयांनो, ना घंटा वाजेल, ना गवत उगवेल; पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी
इस्लामाबाद : पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले असून, लोकांची अवस्था अतिशय वाईट आहे. १ किलो पिठासाठी १ किलोमीटर लांबीच्या रांगा लावल्या जात आहेत. असे असूनही पाकिस्तानी राजकारणी मात्र भारतावर अणुबॉम्बने हल्ला करण्याची धमकी देत आहेत.
पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला धमकी दिली आहे. भारतीयांनो, बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही आणि भारतात गवतही उगणार नाही, असे म्हणत अहमद यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे.
शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे. मी म्हणालो, भारतीयांनो, आमच्याकडे असे मसाले आहेत की, त्यामुळे बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही, ना भारतात गवत उगवेल. संपूर्ण जगाला मी जाहीर करू इच्छितो की आपण उपाशी राहू. आपण नग्न होऊ, अनवाणी पायाने फिरू, मात्र आम्ही २४ कोटी जनता पाकिस्तानसाठी लढेल आणि मरेलही.
यापूर्वीही दिला इशारा
२०१९ मध्ये अहमद यांनी कलम ३७० हटवल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली होती. आमच्याकडे भरभरून अणुबॉम्ब आहेत, आम्हाला पाहिजे तिथे आम्ही हल्ला करू शकतो, असे ते म्हणाले होते. शेख रशीद अहमद हे इम्रान खान यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पाकिस्तानचे ३८ वे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. याआधी ते रेल्वेमंत्रीही राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी रेल्वेची अवस्था अत्यंत वाईट होती.