कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 20:33 IST2025-04-19T20:28:59+5:302025-04-19T20:33:51+5:30
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
Indian Student Shot Dead: परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. गुरुवारी कॅनडातील हॅमिल्टनमध्ये बस स्टॉपवर पंजाबमधील एका विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांच्या निशाण्यावर भारतीय विद्यार्थीनी नव्हती असे पोलिसांनी सांगितले. हॅमिल्टन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबार संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास झाला. विद्यार्थिनीचे नाव हरसिमरत कौर रंधावा होते आणि ती पंजाबमधील तरनतारनची रहिवासी होती. हरसिमरत रंधावा मोहॉक कॉलेजची विद्यार्थिनी होती.
गोळी लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या हरसिमरत रंधावाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. या घटनेबाबत हॅमिल्टन पोलिसांनी सांगितले की, रंधावा निर्दोष होती आणि तिला दोन गटांमधील संघर्षात गोळी लागली. पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. हरसिमरतच्या मृत्यूनंतर टोरांटो येथील भारतीय दूतावसाने दुःख व्यक्त करत आवश्यक ती सर्व मदत करत असल्याचे सांगितले.
"हॅमिल्टन, ओंटारियो येथे झालेल्या भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या मृत्यूने आम्हाला खूप दुःख झाले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वाहनांमध्ये झालेल्या गोळीबारात एका गोळीने ती गंभीर जखमी झाली होती. सध्या या हत्येचा तपास सुरू आहे. आम्ही तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करत आहोत. या कठीण काळात आमच्या भावना आणि प्रार्थना शोकाकुल कुटुंबासोबत आहेत," असे टोरांटो येथील भारतीय दूतावासाने म्हटलं.
हरसिमरत रंधावा बस स्टँडवर बसची वाट पाहत होती. तिच्या छातीत गोळी लागल्याने रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, काळ्या मर्सिडीज एसयूव्हीमधील एका प्रवाशाने पांढऱ्या सेडानमधील लोकांवर गोळीबार केला आणि मुलगी मध्ये आली. गोळीबारानंतर दोन्ही कार लगेचच घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळ्या जवळच्या एका घराच्या मागील खिडकीला लागल्या, जिथे लोक टीव्ही पाहत होते. मात्र घरातील कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही, असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. संशयितांची ओळख पटवण्यास मदत करणारी कोणतीही माहिती किंवा व्हिडिओ फुटेज असल्याचे ते देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या गोळीबारामुळे स्थानिक समुदाय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोहॉक कॉलेजनेही हरसिमरतच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. "रंधावा यांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःख झाले. या कठीण काळात आमच्या संवेदना तिच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आहेत. मोहॉक कॉलेज समुदायाचा सदस्य म्हणून, आम्हाला माहिती आहे की हे नुकसान अनेकांना जाणवत आहे आणि आम्ही हरसिमरतच्या मित्रांना, कुटुंबाला मदत करण्यासाठी शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न करू," असे मोहॉक कॉलेजने म्हटले.